Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीविशाल बर्गे व परवेझ जमादार यांच्याकडून गावठी कट्टा व दोन जीवंत राऊंड...

विशाल बर्गे व परवेझ जमादार यांच्याकडून गावठी कट्टा व दोन जीवंत राऊंड जप्त

कोरेगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार कोरेगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री दोघांवर धडक कारवाई करत एक गावठी कट्टा, दोन जीवंत राऊंड व रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट असा दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. विशाल चंद्रकांत बर्गे व परवेज अमर जमादार अशी दोन संशयितांची नावे असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी त्याप्रमाणे सूचनांचे पालन करत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना बुधवारी रात्री खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विशाल चंद्रकांत बर्गे वय 25, रा. चौथाई गल्ली, कोरेगाव व परवेज अमर जमादार वय 23, रा. कळकाई गल्ली, कोरेगाव हे मेनरोडवरील एका चायनीज दुकानासमोर गावठी कट्टा घेऊन बुलेटवरुन येणार आहेत. त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे, पोलीस नाईक सनी आवटे, कर्मचारी किशोर भोसले व अजित पिंगळे यांना बोलावून घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी चायनीज सेंटर समोर सापळा रचला होता, दरम्यानच्या काळात रात्री 9.45 च्या सुमारास विशाल बर्गे व परवेझ जमादार हे रॉयल एनफिल्ड कंपनीची सिल्वर रंगाची बुलेट क्र. एम. एच. 11. सी-एन. 53 वरुन आले, क्षणाचाही विलंब न करता मिसळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने झडप घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जीवंत राऊंड जप्त करण्यात आले. पोलीस ठाण्यात त्यांना आणण्यात येऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
याप्रकरणी सहाय्यक फौजदार प्रल्हाद पाटोळे यांनी फिर्याद दिली असून, जिल्हा दंडाधिकारी, सातारा यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करुन, आपआपसात संगनमत करुन गावठी कट्टा व जीवंत राऊंड कब्जात घेतल्याचे मिळून आल्याचे नमूद केले. कोरेगाव पोलीस ठाण्यात विशाल बर्गे व परवेझ जमादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना रितसर अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. एस. माने यांंच्यासमोर हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर उचित जामीनावर त्यांची मुक्तता करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे तपास करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular