पाटण:- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेले अकरा दिवस सलग होत असलेल्या मुसळधार पाऊसाने कोयना धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढली असून सोमवारी सकाळी ९ वाजता धरणातील पाणी साठा ९९.७४ टि.एम.सी. झाला होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद १ लाख २३ हजार ९०० क्युसेस इतकी वाढली आहे. तर कोयना धरणाचे सहावक्र दरवाजे ११ फुटावरुन १४.६ फुटावर उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १ लाख ३ हजार ६०० क्युसेस सुरू आहे. सद्या कोयना धरणातील पाणीसाठा ९९.७५ टि.एम.सी इतका झाला आहे. तर सावरवाडी (कडवे ब्रु.) बोर्गेवाडी, म्हारवंड येथे मोठ्या प्रमाणात जमिनी खचल्या असुन गावांना धोका निर्माण झाला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडणारा पाऊस आणि धरणातील सोडलेले पाणी यामुळे कोयना नदीपात्रातील पाण्यात देखील झपाट्याने वाढ होऊन महा पुरपरस्थिती निर्माण झाली आहे. कोयना नदीवरील नेरळे, मुळगाव हे पुल पाण्याखाली गेले आहेत. तर नवीन संगमनगर धक्का, निसरे पुलाला पाणी घासून जात आहे. नदी काठावरील अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर कराड – चिपळूण मार्गावर अनेक ठिकाणी आले असून वाहतूक ठप्प झाली आहे. अतिदक्षतेसाठी एक्स्ट्रा पोलिस फोर्स मागविण्यात आला आहे. अशा परस्थितीत कोणीही नदीपात्रात उतरु नये. तर कोयना-क्रुष्णा नदी काठावरील गावांनी सतर्क राहवे. असे आहवान प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अधिकारी कुमार पाटील यांनी केले आहे.
अतिरिक्त पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने कोयना नदीला पुरपरस्थिती निर्माण झाली असून हेळवाक पासून नदीकाठावरील सर्व गावांनी सतर्क राहवे. या पुर परस्थितीत पाटण – मोरगिरी विभाग जोडणारा पुल रविवारी रात्री ८ वा. पाण्याखाली गेला तर मुळगाव पुल रविवारी सकाळी १० वा. सुमारास पाण्याखाली गेला. आहे. कोयना नदीला आलेल्या या पुरामुळे हेळवाक, शिरळ, संगमनगर धक्का, पाटण, नेरळे, त्रिपुडी, सांगवड, जमदाडवाडी, मंद्रुळ हवेली, निसरे, नावडी, विहे जुने गावठाण येथील अनेक घरांना व कुटुंबांना या पुराचा धोका निर्माण झाला आहे. तर पाटण येथील मुळगाव रस्ता, कळकेचाळ, नवीन एस.टी. स्टैंड परिसराला या पुराचा धोका निर्माण झाला असून येथील अनेक कुटुंबे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली आहेत. तर हेळवाक, मारुल, शिरळ, पाटण, म्हावशी, येरफळे येथे कराड चिपळूण मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पाऊसाचे प्रमाण वाढते राहिल्यास कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. तरी नागरीकांनी सतर्क राहवे असे अहवान करण्यात आले आहे.
पूरग्रस्तांना सामाजिक कार्यकर्त्यांची मदत.
पाटण येथील पुरग्रस्त स्थलांतरित कुटुंबाची व्यवस्था कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल पाटण, आणि मार्केट यार्ड पाटण येथे केली आहे. या कुटुंबाना सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली. तर शिवसेना पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील (नाना) यांनी पूरग्रस्त कुटुंबाना नवीन कपड्याचे वाटप करून मदत केली.
प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस फोर्स अलर्ट
कोयना धरणाला पुरपरस्थिती निर्माण झाल्यापासून पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार श्रीरामहरी भोसले चांगलेच अलर्ट झाले असून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे स्वतः पुरग्रस्त भागात रात्री- दिवसा प्रत्येक तासाला पाहणी करून नागरीकांची विचार पुस करत आहेत. तर तहसीलदार देखील तेवढेच अलर्ट आहेत. प्रांतांनी आदेश केल्यानंतर पोलीस विभाग मात्र सोमवारी सकाळ पासून अलर्ट झाले आहे.