Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपूर बाधित व्यावसायिकांनाही शासनाने भरीव मदत द्यावी : - सत्यजीतसिंह पाटणकर...

पूर बाधित व्यावसायिकांनाही शासनाने भरीव मदत द्यावी : – सत्यजीतसिंह पाटणकर ; वेळप्रसंगी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा.

पाटण :- पाटण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टी व महापूराचा फटका नदीकाठच्या शेती, घरांसह बाजारपेठातील व्यापारी, उद्योजक, दुकानदारांनाही बसला आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारऱ्या नुकसान भरपाईत या व्यावसायिकांचाही समावेश करून त्यांचेही पंचनामे करून त्यांना सरसकट कर्जमाफी व शासकीय मदत निधी तातडीने मिळावा अन्यथा याविरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला दिला . स्थानिक लोकप्रतिनिधी या नुकसान मदत, पंचनामे करताना केवळ चमकोगीरी करून प्रसिद्धी मिळविण्यापलीकडे काहीच करत नसल्याचा आरोपही त्यांनी यानिमित्ताने बोलताना केला.

पाटण विधानसभा मतदारसंघातील पुरबाधीत लोकांनी एकत्रीत येवून सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रांत कार्यालयात जावून उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांना हे निवेदन दिले. यावेळी बोलताना सत्यजीतसिंह पाटणकर म्हणाले पाटण विधानसभा मतदारसंघात यावर्षी अतिवृष्टी, महापूराचे अभूतपूर्व संकट आले. याला निसर्गाइतकेच राज्य शासन व प्रशासनही जबाबदार आहे. याबाबत आवश्यक त्या उपाययोजना, नियोजन केले गेले नाही त्यामुळेच ही कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. याची नैतिक जबाबदारी स्विकारत शासनाने येथे भरीव व तातडीने अधिकाधिक मदत द्यावी. पंचनामे करताना निकषांचा बागुलबुवा न करता शेती, घरे, जनावरे, सार्वजनिक रस्ते, साकव पुल, मोरया, रस्ते, छोटे मोठे पुल यांचेसोबतच ज्या बाजारपेठांना या आपत्तीचा फटका बसला त्या दुकानदार, व्यापारी, छोटे मोठे उद्योजक यांचेही सरसकट पंचनामे करावेत. बाधीतांची सरसकट कर्जमाफी करावी व त्यांना भरीव अशी मदतही करावी. या मतदारसंघात जिथे जिथे नद्यांचे पाणी घुसले त्याला निसर्गापेक्षाही कोयना धरणातून सोडण्यात आलेले महाकाय पाणी हेच जबाबदार आहे. कारण एका बाजूला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले त्याचवेळी स्थानिक ठिकाणीही मुसळधार पाऊस पडत होता. हे पावसाचे पाणी कोयना नदीपात्रात सामावून घेत नसल्याने या पाण्याच्या फुगीचे तोटे स्थानिक बाजारपेठांना बसले आणि यातूनच संबंधितांची कोट्यावधीची वित्त हानी झाली आहे. एका बाजूला आर्थिक मंदीचे सावट तर दुसरीकडे नेमक्या सणासुदीच्या काळात संबंधित व्यापारयांनी दुकानात भरलेला लाखोंचा माल, साहित्य या आपत्तीत उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या कृत्रिम आपत्तीची जबाबदारी स्विकारत शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन संबंधितांना न्याय मिळवून द्यावा. येथे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा.

पाटणचे चमको लोकप्रतिनिधी हे संबंधितांना न्याय मिळवून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. आता तेच या शासनाच्या तोकड्या मदतीचा बागुलबुवा करून रडीचा डाव खेळत आहेत. कधी फूटभर पाण्यात जे . सि. बी चा तर कधी बोटींचा वापर तर फोटोसेशनसाठी चिखलात ऊसाच्या फडात फिरल्याची नौटंकी करणाऱ्या या महाभागांनी खाजगी संस्था, संघटना, दानशूर व्यक्तींनी दिलेली मदत कारखान्यावर नेऊन पुन्हा शासन, पक्ष अथवा स्वतःच्या नावावर तेही गटाची तोंड बघून वाटण्याचा सपाटा लावला आहे. आत्तापर्यंत शासन, पक्ष, पालकमंत्री व नुकसान भरपाई, मदत यांचे गोडवे गायले पण यात आपले पितळ उघडे पडले की पुन्हा शासनाच्या नावाने बोंबाबोंब करून त्यातूनही सहानुभूती व प्रसिद्धी मिळविण्याचा या संसदपटुंचा खेळ जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. येथे पुरबाधीत शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही यासाठी वाट्टेल त्या आंदोलनाचीही आपली तयारी असल्याचे मतही शेवटी सत्यजीतसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.

यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या हस्ते श्रीरंग तांबे  यांना देण्यात आले. याबाबत बोलताना श्रीरंग तांबे यांनी या निवेदनातील मागण्यांचा तातडीने विचार होईल याबाबत आवश्यक ती कार्यवाही सुरू असून आपल्या मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. उज्ज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, सरचिटणीस सुभाषराव पवार, पाटण नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापारी, उद्योजक, शेतकरी व पुरग्रस्त बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular