संचालक, अधिकारी व लेखापरीक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल
कोरेगाव : दिव्यदत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सन 2011 ते 2016 या कालावधीत चेअरमन राजेंद्र गांधी, व्हाईस चेअरमन भगवान शिर्के यांच्यासह चार संचालक, दोन अधिकारी व तीन लेखापरीक्षकांनी संगनमताने 30 कोटी 78 लाख 47 हजार 306 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अप्पर लेखापरीक्षक राणी घायताडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की पूर्वाश्रमीच्या दत्तदिगंबर नागरी सहकारी पतसंस्था व सध्याची दिव्यदत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी अप्पर लेखापरीक्षक राणी घायताडे यांना सन 2011 ते 2016 या कालावधीचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश निर्गमित केले होते. अप्पर लेखापरीक्षक राणी घायताडे यांना दिले होते. त्यांनी एक वर्ष लेखापरीक्षण करुन दि. 15 जुलै 2019 रोजी आपला अहवाल दि. 31 जुलै 2019 रोजी जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांना सादर केला होता. सदरील अहवाल त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास दि. 16 ऑगस्ट रोजी दिला होता. त्यावर दि. 19 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अप्पर लेखापरीक्षक राणी घायताडे यांना प्राधिकृत केले होते.
अप्पर लेखापरीक्षक राणी घायताडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, पतसंस्थेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी व त्यावरील व्याज संस्था पदाधिकारी व संचालकांनी आपसात संगनमत करुन दि. 1 एप्रिल 2011 ते दि. 31 मार्च 2016 या कालावधीत चाचणी लेखापरीक्षण करताना आढळून आलेल्या अपहार व गैरव्यवहार करुन संचालक मंडळाने विश्वस्ताची भूमिका पार न पाडता पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र हिरालाल गांधी, व्हाईस चेअरमन भगवान रघुनाथ शिर्के, संचालक संजय हिरालाल गांधी, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, ताजुद्दिन हसन इनामदार, रत्नमाला अर्जुन बोबडे यांनी विश्वासघात करुन ठेवीदार, सभासद व शासनाची 30 कोटी 78 लाख 47 हजार 306 रुपयांची आर्थिक फसवणूक, अपहार व गैरव्यवहार केला आहे. तसेच लोणंद शाखेचा व्यवस्थापक महेंद्र सावता सागर, प्रमाणित लेखापरीक्षक संजय रामचंद्र पंडीत, सनदी लेखापाल गणेश खटावकर यांनी त्यांना अपहार व गैरव्यवहारास सहाय्य केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास श्रावण शिंदे याने पोटनियम बाह्य व कायदा कानून उल्लंघन करुन कामकाज केले आहे. सभासद व ठेवीदारांचा विश्वासघात करुन फसवणूक केली आहे.
याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे तपास करत आहेत.
दृष्टीक्षेपात अपहार व गैरव्यवहाराची व्याप्ती
अप्पर लेखापरीक्षक राणी घायताडे यांनी आपल्या तक्रारीमध्ये अनेक मुद्यांचा उहापोह केला आहे. सदरील अपहारीत रकमेमध्ये व्याज रकमेचा उल्लेख देखील आहे. 13 कोटी 79 लाख 52 हजार 946 रुपयांचे विनातारणी कर्ज वाटप, संशयित बुडीत कर्ज निधीचाच गैरविनियोग करुन सभासद रक्कमा जमा घेऊन केलेला अपहार 1 कोटी 69 लाख 95 हजार 205 रुपये, फर्निचर खरेदीसाठी टाकलेली रक्कम 19 लाख 19 हजार 712 रुपये, फलटण येथील सर्वोदय पतसंस्थेची जागा विक्री रक्कम 1 कोटी 6 लाख 24 हजार रुपये, विनातारणी (मॉर्गेज)कर्ज 2 कोटी 61 लाख 59 हजार 521 रुपये असे एकूण 30 कोटी 78 लाख 47 हजार 306 रुपयांचा अपहार झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कोरेगावच्या दिव्यदत्त दिगंबर पतसंस्थेत सुमारे 30 कोटी 78 लाखांचा गैरव्यवहार
RELATED ARTICLES