Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedउदयसिंह पाटील भाजपात आले तरी माझी हरकत नाही ः डॉ.अतुल भोसले

उदयसिंह पाटील भाजपात आले तरी माझी हरकत नाही ः डॉ.अतुल भोसले

कराड दक्षिण मतदार संघातील विविध कामासाठी 78 कोटींचा निधी मंजूर ः तातडीच्या कामांना उद्यापासून सुरवात
कराड : राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे जागा वाटपाचे व मतदारसंघाचे धोरण अजून निश्‍चित झाले नाही. कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघही अनिश्‍चित आहे. भाजप व सेनेत कोणीही यावे याला बंधन नाही. उदयसिंह पाटील हे जरी भाजपात आले आणि पक्षाने त्यांना तिकीट दिले तरी माझी काही हरकत असणार नाही. भाजपने दक्षिणमध्ये तिकीट दिले तरी मी त्यांचा पक्षाचा आदेश म्हणून प्रचार करेन, असे मत श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ.बाळासाहेब पाटील, त्यांचे बंधू जयंत पाटील (काका) यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर डॉ.अतुल भोसले म्हणाले, जयंत पाटील (काका) हे आमचे मित्र आहेत. मागील मलकापूर निवडणूकीत आम्ही एकत्र होतो. त्यांचे व आमचे सलोख्याचे संबंध आहेत. वेळप्रसंगी ते आमचे काम करतील, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये मतभेद नाहीत, एकमत आहे. मागे काही वर्षापूर्वीची परिस्थिती व आजची परिस्थिती पाहता ते दिसून येते. जुन्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नाही. या प्रश्‍नावर ते म्हणाले, असा कोणताही प्रकार नसून आम्ही या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसारच काम करत आहोत.
महापूर व अतिवृष्टीमुळे कराड दक्षिणमधील नदीवरील पुलांचे, रस्त्यांची मोठी हानी व दुरवस्था झाली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांच्याकडे या कामाबाबत लक्ष वेधून तसा तालुक्यासाठी 77 कोटी 83 लाखाची मागणी केली आहे. त्यानुसार 36 कोटी 65 लाख रूपयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी 8 कोटींची तातडीची कामे करावीत, यासाठी मंजुरी दिली असून ही कामे उद्यापासून हाती घेतली आहेत. उर्वरित रक्कम येत्या 8 दिवसांत उपलब्ध होणार असून, पुढील कामे हाती घेणार आहोत.
तालुक्यातील रेठरे बुद्रुक, खुबी, कार्वे, कोडोली, दुशेरे, पोतले या गावांना प्रत्येकी 5 कोटी रूपयेपर्यंतचा निधी संरक्षक भिंतीसाठी मंजूर करण्यात आला आहे. तर रेठरे बुद्रुक येथे कृष्णा नदीवरील पुलास 36 कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे. तोही शासनाने मंजूर केला आहे. त्याचेही काम हाती घेण्यात आले आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular