पाटण:- छत्रपती शिवराय.. शंभुराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पाटण येथील सुंदरगड (दातेगड) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचत आसताना गेली पंधरा वर्षे किल्ले सुंदरगडावर चाललेल्या संवर्धन कार्याची दख्खल साक्षात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड जिल्ह्यातील पेण येथील सह्याद्री प्रतिष्ठान या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने घेतली असता रायगडाच्या कुशीत किल्ले सुंदरगड (दातेगड) चा “सह्याद्री गौरव सन्मान पुरस्कार” देऊन सन्मान केला. हा सन्मान खऱ्या अर्थाने सुंदरगडाच्या संवर्धनासाठी सहभाग घेतलेल्या प्रत्येक छत्रपती शिवमावळ्यांनचा आणि रणरागिणींचा आहे. हा सन्मान रक्षा मेडल पद्मश्री मुरलीकांत पेटकर, राज्य पुरातन विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, शिवव्याख्याते व क्रुष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आ. धर्यशील पाटील यांच्या हस्ते स्विकारताना सुंदरगड संवर्धन मावळ्यांना छत्रपतींचा किल्ल्यावर आणखी जोमाने संवर्धन कार्य करण्याची नवीन उर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
सुंदरगड (दातेगड) संवर्धन समितीला दुर्ग संवर्धन क्षेत्रातील अतुलनीय योगदाना बद्दल राज्य स्तरीय “सह्याद्री गौरव सन्मान पुरस्कार” २०१९ मिळाला. हा पाटण महालातील शिव मावळ्यांच्या सांघिक शिव विचारांचा जय म्हणावा लागेल. खरतर काम म्हणून नाही तर ‘शिवकार्य’ या निर्स्पुह भावनेने केलेले हे कार्य पाटण तालुक्याच्या व पर्यायाने पाटण महालाच्या सन्मानास पात्र ठरले. २४ आॅगष्ट २०१९ आगरी समाज हाॅल. चिंचपाडा, पेण, रायगड जिल्हा या ठिकाणी हा सन्मान सोहळा संपन्न झाला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरातन विभागाचे संचालक डाॅ. तेजस गर्ग, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, शिवव्याख्याते व क्रुष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे – पाटील, आमदार धैर्यशील पाटील, दिलीप घोरपडे अध्यक्ष – सह्याद्री प्रतिष्ठान, संजय केळकर, समीर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राज्य पुरातन विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे म्हणाले राज्य पुरातन विभागाचे कार्य आणि गड किल्ल्यावर शिवमावळ्यांच्या श्रमदानातून गड संवर्धनाचे सुरू झालेले कार्य हे एकच आहे. इतिहास कालीन वास्तू, गडकिल्ले यांचे महत्त्व पुढच्या पिढीला समजण्यासाठी यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. नाहीतर इतिहासाची पाने चाळून आणि चित्रातूनच इतिहासातील वास्तू, गडकिल्ले पहावी लागतील. महाराष्ट्र शासनाचा पुरातन विभाग हा तोकडा आहे. या विभागाकडून राज्यातील प्रत्येक इतिहासीक गडकिल्ले आणि वास्तू वर लक्ष ठेवणे आवघड आहे. मात्र शिवसंवर्धन कार्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना राज्य पुरातन विभाग सहकार्य करेल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा. नितीन बानुगडे – पाटील म्हणाले पुरस्कार देणार्या खूप संस्था आहेत. पण हा पुरस्कार प्रधान होणार्यास साक्षात दुर्गदुर्गेश्वर रायगडचा आशीर्वाद मिळाला असे समजावे. कारण मी ही या पुरस्काराचा पहिला मानकरी आहे. या पुरस्काराने माझा उत्कर्ष झाला. म्हणजेच हा पुरस्कार उत्कर्ष घडवून आणनारा पुरस्कार आहे. तुम्ही केलेले कार्य हे अतुलनीय आहे. असेच कार्य उत्तरोत्तर होऊन आपल्या माध्यमातून शिवकार्य साता समुद्रा पार जावो. समाजाला पुरक दिशा मिळो. अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या. सह्याद्री प्रतिष्ठानकडून दिलेला पुरस्कार अतुलनीय कामासाठीच दिला जातो असे त्यांनी यावेळी सांगितले.
किल्ले सुंदरगड (दातेगड) संवर्धन कार्यासाठी मिळालेला हा सन्मान संवर्धन समितीचे मावळे तथा टोळेवाडी गावचे जेष्ठ नागरिक माजी सरपंच नारायण डिगे, शंकरराव कुंभार, काशिनाथ विभुत्ते, शंकरराव मोहिते, लक्ष्मण चव्हाण, अनिल भोसले, अनिल बोधे, राजेंद्र सांळुखे, आनंदा मोळावडे, निलेश फुटाणे, अनिस चाऊस, राम सांळुखे, या मावळ्यांनी स्विकारला. सुंदरगड (दातेगड) च्या या झालेल्या सन्मानाबध्दल सर्व स्तरातून या मावळ्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो- रक्षा मेडल पद्मश्री मुरलीकांत पेटकर, डॉ. तेजस गर्गे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आ. धर्यशील पाटील यांच्या हस्ते सह्याद्री सन्मान पुरस्कार स्विकारताना सोहळा सुंदरगड संवर्धन समितीचे शिवमावळे.