Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीऔंध येथे वाडी रत्नागिरी जोतिबा येथील पालखीचे उत्साहात स्वागत

औंध येथे वाडी रत्नागिरी जोतिबा येथील पालखीचे उत्साहात स्वागत

औंध: महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या दख्खनचा राजा वाडी रत्नागिरी जोतिबा येथील जोतिबा देवाच्या पालखीचे औंध येथे मोठ्या उत्साहात सोमवारी सायंकाळी चार वाजता आगमन झाले. यावेळी औंध ग्रामस्थांनी फटाके वाजवून, गुलालाची उधळण करून पालखीचे स्वागत केले. जोतिबाच्या नावानं चांगभल, आई उदे ग अंबे उदेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
मागील वीस वर्षांपासून सुरू असलेली औंधची ग्रामनिवासिनी श्रीयमाई व जोतिबा देवाच्या भेटीची परंपरा आजही सुरू असून प्रतिवर्षी श्रावण महिन्याचे औचित्य साधून जोतिबा डोंगरावरुन इस्लामपूर, ताकारी, कडेगाव, पुसेसावळी मार्गे ही पालखी पायी औंध येथे येते.
सोमवारी दुपारी साडेतीन वाजता येथील नवीन बसस्थानक परिसरातील चौकात या पालखीचे व दिंडीचे आगमन झाले. यावेळी जोतिबाच्या प्रतिमेचे व पादुकांचे पूजन करण्यात आले तसेच पालखीचे स्वागत करण्यासाठी यावेळी औंधसह परिसरातील ग्रामस्थ, भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून,वाद्यवृंदाची सलामी देऊन पालखी व जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ, पुजारी, भाविकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी औंध ग्रामस्थांच्या वतीने पालखी व दिंडीतील पुजारी बांधव व भाविकांना चहाप्रसाद वाटप करण्यात आले.
त्यानंतर पालखीची भव्य मिरवणूक औंध गावातील जुने एसटी स्टँड, ग्रामपंचायत चौक, हायस्कूल चौक मार्गे काढण्यात आली त्यानंतर ग्रामनिवासिनी श्री यमाई देवी मंदिरात नेऊन त्याठिकाणी जोतिबा देवाची प्रतिमा व पादुकांचे पूजन करण्यात आले तसेच ग्रामनिवासिनी श्रीयमाई देवीचे ही विधीवतपणे पूजन करण्यात आले त्यानंतर आरती, मंत्रपठन आदी कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर मिरवणूकीने जोतिबाची पालखी पद्माळे तळयावरील शंभूपुरी मठात आणण्यात आली. त्याठिकाणी प्रतिमा व पादुकांचे पूजन करण्यात आले.
मंगळवारी पहाटे श्रींना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर होमहवन, केदारग्रंथ वाचन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी औंधसह जिल्ह्यातील भाविकांनी जोतिबा देवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सुमारे पंचवीस हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular