कराड : राज्यात 2014 पूर्वी सत्तेमध्ये असलेले काँग्रेसचे आघाडी सरकार हे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे राज्यातून हद्दपार झाल्याची टीका ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केली. अतुलबाबांच्या प्रयत्नातून भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणला कोट्यवधींचा विकासनिधी उपलब्ध झाल्यामुळे, आगामी निवडणुकीत अतुलबाबा विक्रमी मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास कोळेवाडी येथे आयोजित शेतकरी जागृती मेळाव्यात श्री. मोहिते यांनी व्यक्त केला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, माजी संचालक श्रीरंग देसाई, म्हाडाचे संचालक मोहन जाधव, सचिन पाचपुते, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष संजय पवार, दादासो देवकर, डॉ. अनिल चिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मोहिते म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण यांना अपघाताने मुख्यमंञीपद मिळाले. 2014 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कराड दक्षिण मतदारसंघात निधी टाकला. माझ्या सहकार्यामुळेच त्यांना त्यावेळी आमदारकी मिळाली. परंतु आमदार झाल्यावर चव्हाण यांनी या मतदारसंघाकडे ढूंकुनही पाहिले नाही. ते आमदार झाले; पण राज्यातून काँग्रेस हद्दपार झाली. आमच्या सारख्यांना त्यांनी वार्यावर सोडून दिले. म्हणून आम्हीही त्यांना सोडण्याचा योग्य निर्णय घेवून मोकळे झालो. सध्या तालुक्यातील काँग्रेसने 2014 पूर्वी केलेल्या विकासकामांचे फ्लेक्स प्रत्येक गावांमध्ये लावलेले आहेत. पण त्यांनी गेल्या पाच वर्षातील लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करुन आता तुम्हाला आमदार होता येणार नाही.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या यशस्वी कामगिरीमुळे राज्यातील अनेक पक्षातील लोक भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. दक्षिणेतील नवीन रस्त्यांसाठी आमचे प्राधान्य आहे. शेतीसाठी सिंचन योजना सक्षम करणे, गावागावांमध्ये पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी आमचा पाठपुरावा असेल. तसेच रोजगार निर्मितीवरही आमचा भर असेल. विकासाची दृष्टी असणार्या अतुलबाबांना तुम्ही सर्वांनी साथ द्या, ते या भागाचा कायापालट करतील.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की भाजप सरकारने स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेबांच्या समाधी परिसरातील पूरसंरक्षण भिंत बांधण्यासाठी मंजूरी देऊन, त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. लवकरच कोळेवाडीतील धनगर समाजाच्या मंदिरासाठीच्या कामासाठी निधी उपलब्ध केला जाणार असून, कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
यावेळी या विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमाला काशीनाथ पाटील, हेमंत गरुड, प्रताप पवार, सुहास कदम, संजय पवार, पांडूरंग सावंत, अजित खबाले, विकास कदम, उमेश पाटील, अशोक मोरे, अरविंद देसाई यांच्यासह परिसरातील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे राज्यातून काँग्रेस हद्दपार ; कोळेवाडीतील शेतकरी मेळाव्यात ज्येष्ठ नेते मदनदादा मोहिते यांची टीका
RELATED ARTICLES