पाटण:- देशाचा जाणता राजा असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांना राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. यामुळे राज्यासह देशातील शासनकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. राज्यात खा. शरद पवार यांना मिळणारी सहानुभूतीची लाट ही निश्चितच परिवर्तन घडविणार या भितीनेच राज्य सहकारी बँकेशी त्यांचा कोणताही संबंध नसतानाही त्यांना ई. डी. च्या माध्यमातून जाणीवपूर्वक व सुडबुद्धीने अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून राज्यभर जनप्रक्षोभ आणि उठाव होईल यात शंकाच नाही. आकसापोटी झालेल्या या कारवाईचा पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वच जनतेच्या वतीने मी जाहीर निषेध करत असून या शासनकर्त्याना याची भलीमोठी किंमत चुकवावीच लागेल असा इशारा राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दिला.
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत झालेल्या निषेध बैठकीत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर शेडगे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, युवक अध्यक्ष गुरुनाथ शेडगे, युवती अध्यक्षा सौ. रोहिणी पाटील, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले यापूर्वी राज्य सहकारी बँकेने नेहमीच जनहितासाठी काम केले. यात राज्यातील शेतकरी, सहकार जगावा हाच प्रमुख उद्देश होता. मात्र आता नेमक्या निवडणुकीच्या तोंडावर या शासनकर्त्यांनी हे ई. डी. चे हत्यार उपसले आहे. परंतु यात शरद पवार यांचा कोठेही आणि कसलाही संबंध नसताना त्यांचेवर राजकीय सुडबुद्धी व आकसाने ही कारवाई केली जात आहे. राज्यात या नेत्याला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद हा या सत्ताधारयांच्या डोळ्यात खुपत आहे त्यामुळे पवारांचे तोंड बंद करण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न ही जनताच उलथवून टाकल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. त्यामुळे या बेकायदेशीर कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचेही यावेळी बोलताना विक्रमसिंह पाटणकर यांनी सांगितले.
यावेळी अनेक मान्यवरांनीही या कारवाईचा तिव्र निषेध व्यक्त केला. यावेळी पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे ,नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, सौ. शोभा कदम आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापारी उपस्थित होते.
* चौकट – गुरूवारी पाटण बंद.
खा. शरद पवार यांचेवर होत असलेली ही कारवाई बेकायदेशीर असून राज्यभर त्यांचा झंझावात निर्माण झाला आहे. या भितीपोटीच ही कारवाई शासनकर्ते करत असून याचा व्यापारी वर्गातूनही तिव्र निषेध करण्यात आला. तर या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ गुरूवारी पाटण बंदची हाक व्यापारयांनी स्वयंस्फुर्तीने दिली असल्याने सर्व व्यवहार यादिवशी बंद रहाणार आहेत.
* निषेधाचे निवेदन शासनाला देणार.
खा. शरद पवार यांचेवर ही कारवाई सुडबुद्धीने व बेकायदेशीर रितीने करण्यात येत असल्याने गुरूवारी सकाळी अकरा वाजता येथील राष्ट्रवादी कार्यालयात मान्यवर जमा होणार असून त्यानंतर युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईच्या निषेधाचे निवेदन तहसीलदार पाटण यांचेमार्फत शासनाला देण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी दिली.
फोटो खा. शरद पवार यांचेवर होत असलेल्या बेकायदेशीर कारवाईचा निषेध करताना माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर समोर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व व्यापारी.