Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीदक्षिणेतून अतुलबाबांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

दक्षिणेतून अतुलबाबांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

गुरुवारी शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार
कराड : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या उमेदवारीवर मंगळवारी (ता. 1) शिक्कामोर्तब झाले. भारतीय जनता पार्टीने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अतुलबाबांच्या उमेदवारीची घोषणा केली. विशेष म्हणजे पहिल्या 5 नावांमध्ये अतुलबाबांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, गुरूवारी (ता. 3) डॉ. अतुलबाबा भोसले विजय संकल्प रॅलीच्या माध्यमातून कराड दक्षिणेत भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने डॉ. अतुलबाबा भोसले यांची उमेदवारी घोषित केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी या मान्यवरांसह निवडणूक समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. या मान्यवर सदस्यांनी निश्‍चित केलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या 125 उमेदवारांची यादी मंगळवारी (ता. 1) दिल्लीत जाहिर करण्यात आली. सुरवातीच्या 5 नावांमध्ये अतुलबाबांचा समावेश असल्याने पक्षाचे विशेष लक्ष या मतदारसंघाकडे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी (ता. 3) सकाळी ठिक 10 वाजता दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन अतुलबाबा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाणार आहेत. त्यानंतर दत्त चौकातून भव्य मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, भाजपचे नेते अ‍ॅड. भरत पाटील, जयंतकाका पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनराव मोहिते, चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस बळवंतराव पवार, माथाडी कामगार नेते पोपटशेठ पाटील, रामकृष्ण वेताळ, अशोकराव भावके, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत सदस्य आदींसह स्थानिक स्वराज संस्था, सहकारी संस्था यांचे सदस्य, नगरसेवक, सरपंच तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दत्त चौकातून सुरू होणारी मिरवणूक पुढे आझाद चौक, चावडी चौक मार्गे कन्या शाळा येथे पोहचल्यावर त्याठिकाणी भव्य सभा होणार आहे. तरी या मिरवणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता दत्त चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular