पाटण:- पाटण तालुक्याचे आमदार शंभुराजे देसाई हे महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी आजवर कधीही युतीधर्म पाळला नाही, भाजपला कधीच विश्वासात घेतले नाही. निवडणूक लागुनही उमेदवार म्हणून मित्रपक्ष भाजपाच्या कार्यकर्त्यांना नेहमीच अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे भाजप पक्षाच्या वतीने पाटण विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचे भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष दिपक महाडिक यांनी पाटण येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
पाटण विधानसभा मतदारसंघातून दिपक महाडिक यांनी भाजपच्या वतीने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना दिपक महाडिक म्हणाले विधानसभेला जरी बंडखोरी केलेली असली तरी ही लोकसभेला आम्ही महाराजांनाचं मदत करणार. भाजप कडून मुख्यमंत्र्यांकडून विकास कामे आणली तरी त्यांनी कधीही तालुक्यातील भाजपला विश्वासात घेतले नाही. स्थानिक आमदारांनी आम्हाला कधीही बरोबर घेऊन काम केलेले नाही. मुख्यमंत्री माझे मित्र आहेत असे म्हणतात मग आम्हाला का कधी बरोबर घेऊन काम करत नाहीत. वरती युती झाली पण तळागाळामध्ये कुठे युती झाली.
यावेळी बोलताना भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ डुबल म्हणाले की भारतीय जनता पार्टी पाटण तालुक्यामध्ये १९९५ पासून कार्यरत आहेत. युतीचा धर्म राखुन आमदार शंभूराज देसाई साहेबांना आम्ही वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. परंतू शंभूराज देसाई यांनी आम्हाला केव्हाही सहकार्य केलेले नाही. निवडणूक लागल्यानंतर त्यांनी आम्हाला केव्हाही विश्वासात घेतलेले नाही तर आमची एखादी बैठक ही घेतलेली नाही. नेहमीच अपमानास्पद वागणूक दिली. म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिपक महाडिक यांचा उमेदवार अर्ज पाटण विधानसभा मतदारसंघातून दाखल करून बंडखोरी केलेली आहे. असे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ डुबल यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे कमलाकर पाटील, रामभाऊ डुबल, नंदकुमार सुर्वे, प्रकाश सुतार, विलास चव्हाण, धिरज कदम यांचेसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.