सातारा दि. १८ – जेष्ठ विचारवंत , प्राच्यविद्या पंडित प्रा. डॉ. आ.ह. साळुंखे यांची साहित्यिक , सामाजिक , सांस्कृतिक , वैचारिक जडणघडण व सर्वांगीण माहिती असलेल्या
” आ.ह. ” एक विचारपर्व , विनयी विद्रोही या माहिती पटाचा लोकार्पण सोहळा घरगुती स्वरूपात सातारा येथे संपन्नता झाला.
हा लोकार्पण सोहळा प्रा. डॉ. आ.ह. साळुंखे , ऍड. डी. एम. जगताप , सुशील पगारे , दिग्दर्शक सचिन सुशील , विजय मांडके , दिपक ढाणे , अमृत साळुंखे , राकेश साळुंखे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना हा माहितीपट दाखवण्यात आला.
या माहितीपटाचे दिग्दर्शन , संहिता संशोधन प्रसिध्द दिग्दर्शक सचिन सुशील ( मुंबई ) यांनी केले आहे. निर्मिती लोकायत प्रकाशनचे राकेश साळुंखे यांची असुन संकल्पना व सहाय्यक दिग्दर्शन पत्रकार प्रभाकर ढगे ( पणजी ) यांचे आहे.व्हाईस ओव्हर मिलिंद कांबळे यांचे असुन संगीत जितेंद्र तुपे यांचे आहे. संपादन गौरव पाटील व पुलकेशी साळुंखे यांनी केले आहे. आ.ह. साळुंखे यांचे बालपण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील शिवाजीनगर येथे गेले. त्यांचे कुटुंब , त्यांचे शालेय , महाविद्यालयीन शिक्षण , नोकरीचा कार्यकाळ , त्यांची विपुल अशी ग्रंथसंपदा , अनेक व्याख्याने , यांचा आढावा या माहितीपटात घेण्यात आला आहे. एकुण ४८ मिनिटामध्ये साळुंखे यांचा जिवनपट या माहितीपटातुन उलगडून दाखवला आहे.
माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप , कवी अशोक नायगावकर , भाई वैद्य ,सयाजी शिंदे , इंद्रजीत घुले , प्रा. डॉ. नवनाथ शिंदे डॉ जयश्री चव्हाण , बशीर अहमद , फ्रान्सिस वाघमारे यांनी प्रा. डॉ. आ. ह.साळुंखे यांच्या कार्याची सांगितलेली माहिती या माहितीपटात पहायला मिळते.
माहितीपटाचे चित्रिकरण वरंधा घाट, गोवा, तासगाव,सावंतवाडी, सातारा कास बामणोली येथे झाले आहे.
या लोकार्पण सोहळ्यावेळी सचिन सुशील , अमृत साळुंखे , राकेश साळुंखे यांचा माहितीपटाच्या निर्मिती बद्दल सत्कार करण्यात आला. विद्रोही सांस्कृतिक चळवळ , सातारच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विजय मांडके यांच्या हस्ते प्रा. डॉ साळुंखे यांचा तुकोबा पगडी व शाल देवून सत्कार करण्यात आला.