Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीभिलकटीच्या सुपुत्रांचा जागतिक दर्जाच्या ट्रायथलॉन स्पर्धेत झेंडा

भिलकटीच्या सुपुत्रांचा जागतिक दर्जाच्या ट्रायथलॉन स्पर्धेत झेंडा

फलटण: भिलकटी (ता. फलटण) येथील अमित डिसले व अमर पवार या दोघा तरुणांनी आयर्न मॅन 70.3 ही गोवा येथे नुकतीच संपन्न झालेली जागतिक दर्जाची ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली असून त्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेचे मूळ स्वरुप म्हणजे एकावेळी 3 क्रिडा प्रकार पूर्ण करावे लागतात, त्यामध्ये प्रथम 1 तास 10 मिनिटात 1.9 किलोमीटर समुद्रामध्ये पोहणे, त्यानंतर लगेच 90 किलोमीटर सायकल चालवणे, पोहणे व सायकलिंग करणेसाठी 5 तास आणि 30 मिनिट वेळ असतो, त्यानंतर 21 किलोमीटरचे अंतर पळून पूर्ण करणे अशी ही स्पर्धा 8.30 तासात पूर्ण करावी लागते.अमित डिसले यांनी ही स्पर्धा 6 तास 27 मिनिटे आणि 27 सेकंद या विक्रमी वेळेत पूर्ण केली तर अमर पवार यांना त्यासाठी 7 तास 16 मिनिटे लागली. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सराव करुन या दोन तरुणांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करुन फलटण तालुक्याचे नाव जगात उंचावण्याचे काम केले आहे. हे दोघेही युवक भिलकटी ता. फलटण जि. सातारा या छोट्या खेड्यातील रहिवासी आहेत. अशा प्रकारच्या अनेक साहसी मोहिमा तसेच साहसी स्पर्धांमध्ये आतापर्यंत या दोन युवकांनी सहभाग घेऊन त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
टाटा फुल मॅरेथॉन मुंबई, लडाख हाफ मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, पुणे हाफ मॅरेथॉन, सातारा हिल सायगक्लोथान, कोल्हापूर रगडियन मॅरेथॉन, हिमालयातील स्पिती व्हॅली सायकल सफर, मोटारसायकलवरुन लेह लडाख सफर अशा अनेक साहसी स्पर्धांमध्ये यशस्वीपणे सहभागी होऊन आपला छंद जोपासला आहे. तसेच सामाजिक उपक्रम म्हणून कॅन्सर जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये हे युवक सहभागी झालेले आहेत. आयर्न मॅन ही जागतिक स्तरावरची स्पर्धा यावर्षी गोव्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना मिळविलेले हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे.
अमित डिसले येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना येथे एन्व्हायरमेंट इंजिनियर म्हणून काम करतात. दिवसभर कारखान्यांमध्ये काम करुन सकाळी व सायंकाळी दररोज पळणे, पोहणे व सायकलिंग याचा सराव त्यांचा चालू असतो. ऊन, वारा, पाऊस कशाचाही विचार न करता एकही दिवस या सर्वांमध्ये खंड पडू न देता केलेल्या मेहनतीचे फळ आज त्यांना मिळाले आहे.
अमर पवार हे इंडियन एअर फोर्स मध्ये कार्यरत आहेत. देश सेवा करत असतानाच अशा प्रकारच्या मोहिमा व स्पर्धामध्ये सहभागी होऊन त्यामध्ये यश मिळविण्याचा छंद त्यांनीही जपलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन यश कसे संपादन करायचे, तसेच अशा प्रकारचे यश मिळविण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे सगळे या स्पर्धा प्रकारातून शिकायला मिळाले असे मनोगत अमित डिसले व अमर पवार यांनी व्यक्त केले.
या दोघांनाही आयर्न मॅन स्पर्धेत यशस्वी झालेले डॉ. प्रणील भोईटे, फलटण यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या अफाट यशासाठी समस्त ग्रामस्थ भिलकटी, फलटण तालुक्यातील तमाम क्रीडाप्रेमींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular