सातारा: कुटूंबातील बालचमूंचे बारसे, वाढदिवस, जावळ, बोरन्हाण, मुंज आदी संस्कारविधी घरोघरी मोठ्या कौतुकाने केले जातात. विशेषत: घरातील पहिल्या अपत्याचे होणारे लाड आणि कौतुकसोहळ्यांची नातेवाईकांमध्ये मोठी उत्सुकता असते. मात्र सातार्यात येत्या शुक्रवारी (दि. 25) चक्क एका वासराचे बारसे होणार असून वसुबारसेच्या मुहूर्तावर रंगणार्या या नामकरण सोहळयास उपस्थित राहाण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या आगळ्यावेगळ्या बारस्याची ही अनोखी गोष्ट अशी की, सातार्यात राजवाडा परिसरातील ऐतिहासिक पंचपाळी हौदामध्ये भाविकांनी दूर्गामाता मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. तिथे दररोज नित्योपचार पुजेसह नवरात्रोत्सव, पौषी, शाकंबरी उत्सव, काकड आरती आदींसह विविध सण, उत्सव आणि धार्मिक विधी उत्साहात आणि मोठ्या श्रध्देने केले जातात. वैदीक संस्कृतीमध्ये असणारे गायींचे महत्त्व लक्षात घेवून मंदिराच्या प्रांगणात गोमातेचेही पालन केले जाते. तेथील लक्ष्मी नामक गायीला झालेल्या वासराचाच नामकरणाचा सोहळा वसुबारसेच्या मुहूर्तावर करण्याचा घाट कार्यकर्ते व भाविकांनी घातला असून त्यानुसार येत्या शुक्रवारी (दि.25) सायंकाळी गोरज मुहूर्तावर या वासराचे बारसे होणार आहे. या वेळी सातारकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढत्या शहरीकरणामुळे गायी, म्हैशी, वासरू आदी कृषीपूरक जनावरांची संख्याही घटत असून केवळ फोटो, मोबाईलस्क्रीन आणि काँम्पुटरवरच या प्राण्यांचे दर्शन होत असते. दिवाळीच्या सणामध्ये गोवत्सपूजनाला विशेष महत्त्व आहे. वसुबारसेला गायी आणि तिच्या वासरांचे पूजन करून त्यांना गोग्रास देण्याची प्रथा आहे. मात्र सातार्यातील महिलांना पूजनासाठी गाय वासरू मिळण्यासाठी मोठी धावाधाव करावी लागत असलयाने गेल्या 12 वर्षांपासून पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्टतर्फे वसुबारसेला प्रत्यक्षातील गाय वासरांची उपलब्धता करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. यंदाही सुमारे गायवासरांच्या 15 जोड्या पंचपाळी हौदमंदिर परिसरात उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे संस्कृतीसंवर्धन आणि गोपूजेचे पुण्य सातारकरांना पदरी पाडून घेता येणार आहे.
मंदिराच्या व्यवस्थापनाने नियमित स्वरूपात पालन केलेल्या लक्ष्मी या गायीला यापूर्वीही उमा नावाचे वासरू आणि शिवा नावाचे खोंड झाले आहे. तर नुकतेच नवरात्रोतसवात ललिता पंचमीच्या मुहूर्तावर एक वासरू झाले आहे. या वासराच्या बाललिलांचे सध्या मोठे कौतुक होत असून त्याच्याच बारस्याचा हा सोहळा घेण्याचे ट्रस्टने ठरविले आहे. दरम्यान धार्मिक कार्यक्रमांच्या बरोबरीने रक्तदान व आरोग्य शिबिरे अन्नदान, आपदग्रस्तांना मदत आदी उपक्रम राबविणार्या या ट्रस्टने घेतलेल्या नामकरण सोहळ्याची शहरात सर्वत्र मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सातार्यात शुक्रवारी रंगणार वासराचा नामकरण सोहळा
RELATED ARTICLES