सातारा: सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे दीपक पवार यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या लढतीत शिवेंद्रसिंहराजेंनी तब्बल 42 हजार 424 मतांनी विजय मिळविला. सातारा मतदारसंघ यापूर्वीही भोसले घराण्याकडे होता. शिवेंद्रसिंहराजेंनी तो “किल्ला’ चौथ्यांदा आपल्या ताब्यात ठेवला.
सातारा शहर, ग्रामीण व जावळी तालुकाच्या विकासाच्या मुद्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमधून ही निवडणूक लढविली, तर भाजपमधून आपला उमेदवारीचा पत्ता कट झाल्याने भाजपमधून बाहेर पडत दीपक पवारांनी राष्ट्रवादीतून निवडणुकीस उतरले. दोघांनीही पक्ष बदल करून ही प्रथमच निवडणूक लढविल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. सकाळी पोस्ट मतमोजणी सुरू झाली. त्यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. प्रत्येक फेरीनिहाय शिवेंद्रसिंहराजेंची मते वाढत गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत होता. त्यामुळे सुरुवारीपासून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.
दुपारी दोन नंतर निकालाचा कौल स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवेंद्रसिंहराजे, वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह कुटुंबियांसमवेत गुलाल उधळून जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन करून विजयोत्सव साजरा केला.
……………..
उमेदवारांची मते अशी…
शिवेंद्रसिंहराजे भोसले : 1,18,005
दीपक पवार : 74581
अशोक दीक्षित : 3154
अभिजीत बिचुकले : 759
विजयानंद शिंदे : 425
शिवाजी भोसले : 947
नोटा : 1978