मसूर: हेळगाव विकास सेवा सोसायटीचे संचालक मंडळ आणि सचिव या दोघांच्या वादात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संस्थेच्या मुख्य कार्यालयाला कुलूप लागले आहे.यामुळे सभासदांमध्ये संभ्रमावस्था झाली असून, ऐन दुष्काळाच्या तोंडावर सभासद शेतकर्यांची सोसायटी मार्फत होणारी कामे पूर्णपणे खोळंबली आहेत.
हेळगाव विभागातील शेतकर्यांची अर्थवाहिनी असलेली हेळगाव विकास सेवा सोसायटीचे कामकाज गेल्या अनेक महिन्यापासून वादाच्या भोवर्यात सापडले आहे. कधी भ्रष्टाचाराचे आरोप तर कधी बोगस कर्ज प्रकरणे तर आता सचिव आणि संचालक मंडळाचा मनमानी कारभार यामुळे सभासद शेतकरी सध्या संतप्त झाला आहे. यावर योग्य तो निर्णय घ्या अन्यथा आम्हीच संस्थेच्या कार्यालयाला कुलूप ठोकतो अशा पवित्र्यात सध्या सभासद आहेत. याबाबतचे लेखी निवेदन प्रसिद्धीस व उपनिबंधक सहकारी संस्था कराड यांना सभासदांच्या सह्यानिशी दिले आहे. अशी माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव जगदाळे व किसन पाटील यांनी दिली.
याबाबत विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले सचिवाचा कारभार संस्थेत मनमानी सुरू असून, संचालक मंडळाला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे सध्याच्या सचिवांना संस्थेमार्फत राजीनामा मागितला.
तसेच सध्याचे संस्थेचे सचिव दत्तात्रय पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्या कामकाजात कुठे गैर प्रकार झाला असेल तर ते मला संचालक मंडळाने दाखवून द्यावे. मग मी योग्य तो निर्णय घेण्यास तयार आहे. माझे कामकाज पारदर्शक असून, मी राजीनामा देणार नाही.
सहा दिवसांपासून हेळगाव सोसायटी कार्यालयाला कुलूप
RELATED ARTICLES