सातारा : शाहुपूरी पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार आलेला अल्पवयीन मुलगा एका चोरीतील संशयीत निघाला आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करंजे परिसरातील महानुभाव मठासमोरील स्वस्तीक ट्रेडर्स या दुकानामध्ये गुरूवारी (ता.7) चोरी झाली होती. या मध्ये चोरट्यांनी 16 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची तक्रार दुकानाचे मालक जयंतीलाल राऊजी पटेल यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली होती. स्वस्तीक ट्रेडर्समध्ये दोन युवकांच्या साथीने चोरी केल्याची कबूली देखील या अल्पवयीन मुलाने दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संतोष नारायण चव्हाण (वय 20) व अजय भानुदास देशमुख (वय 20, दोघे रा. मतकर कॉलनी झोपडपट्टी) यांना अटक केली आहे.
दरम्यान या चोरीच्या तपासासाठी सहायक पोलिस अधिक्षक समिर शेख यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुगुटराव पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक विशाल वायकर यांना सुचना दिल्या होत्या. तसेच गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेजची तपासणी तसेच खबर्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलाचा चोरीत समावेश असल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिस पथक संबंधीत मुलाचा शोध घेत होते. दरम्यानच्या काळात संबंधीत मुलाच्या पालकांनी त्याचे अपहरण झाल्याची तक्रार शाहुपूरी पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे गुन्ह्याचे गांभिर्य वाढले होते. पोलिस संबंधीत मुलाचा कसून शोध घेत होते. काल तो मुलगा शहरातील एका परिसरात आल्याची माहिती शाहुपूरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे पथकातील हवालदार हसन तडवी व लैलैश फडतरे यांनी त्या मुलाचा शोध घेतला. तसेच पालकांच्या समक्ष त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपले अपहरण झालेच नव्हते अशी माहिती पोलिसांना दिली. तसेच चोरीमध्ये माझा हात असल्याची माहिती बाहेर पडल्यामुळे घाबरून मी पळून गेलो होते असेही त्याने पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून चोरी गेलेला माल हस्तगत करण्यात आला आहे. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक भोसले, हवालदार हिम्मत दबडे – पाटील, हसन तडवी, शंकर गायकवाड, लैलेश फडतरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार हे सहभागी होते. हवालदार शंकर गायकवाड तपास करत आहेत.
अपहरण झालेला अल्पवयीनच निघाला चोर
RELATED ARTICLES