मेढा ( अभिजीत शिंगटे ):- मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्याने ऐन थंडीतही वातावरण चांगलेच तापले आहे.
मेढा नगरपंचायतीमधिल नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदांची अडीच वर्षाची मुदत संपलेने रणसंग्राम सुरू झाला आहे. मेढा नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता १६ डिसेंबर पासून अर्ज दाखल करणे प्रक्रिया सुरू होत असून १९ डिसेंबर रोजी अर्ज माघार घेतले जाणार आहेत.२० रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होणार आहे. मेढा नगरपंचायतीत राष्ट्रवादी ७ , भा.ज.पा. १ शिवसेना ३ आणि अपक्ष ६ असे बलाबल असून सध्या नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे बहुमत आहे. मात्र विधानसभेनंतर बदलेल्या राजकीय समिकरणानुसार नेमके काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष होणार की भारतीय जनता पार्टी काय चमत्कार घडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादीमध्ये असताना नगराध्यक्षपद शिवसेनेकडे तर उपाध्यक्ष व उर्वरित सर्व सभापतीपदे राष्ट्रवादीकडे होती. परंतु आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विधानसभेवेळी भाजपवासी झालेने सत्ता राखण्यात कोणती चाल खेळणार हे पहावे लागणार आहे. सध्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणी माजी आ. शशिकांत शिंदे यांची विधानसभा नंतर चाललेली स्पर्धा वाढली असून त्याचे पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. नूकत्याच झालेल्या कुडाळ जि.प. गटाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
मेढा नगरपंचायतीत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप ,यांना आपलाच नगराध्यक्ष असावा असे वाटते या करीता आतापासून अनेक जण बाशिंग बांधून तयार आहे. मात्र संधी कोणाला मिळणार , कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार , पक्षाच्या विचाराचे व नागरीकांच्या पसंतीच्या उमेदवाराची निवड होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत अपक्ष नगरसेवकांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. इच्छूकांनी आतापासूनच आपापल्या पक्षाकडे या पदांसाठी फिल्डींग लावली आहे. त्या दृष्टीने ऐन थंडिमध्ये खलबते, गुप्त बैठका व नगरसेवकांचा संपर्क आदी बाबी चालु आहेत. नगरपंचायतीच्या माध्यमातुन मेढ्याचे शहरीकरण , त्या अनुषंगाने विविध विकासकामे करणारे प्रतिनिधी मेढा नगरीला लाभावेत , गतीमान व पारदर्षी कारभार व्हावा या नागरीकांच्या अपेक्षाला कोण उतरणार हे पाहणेच योग्य ठरणार आहे.