पाटण :- देशातील व राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती यामुळे यावर्षी दि. १ व २ मे रोजी होणारी पाटणची ग्रामदेवता श्रीलक्ष्मीदेवी यात्रा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात सर्वच नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजनांंचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री पांडुरंग देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
याबाबतीत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातील व राज्यातील सार्वजनिक सण, समारंभ तसेच उत्सव, यात्रांवर सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने घातलेले निर्बंध महत्त्वाचे आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील ग्रामदेवता श्रीलक्ष्मीदेवीची दि.१ व २ मे रोजी भरणारी यात्रा व त्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले असून प्रवेशबंदी असल्यामुळे दर्शनासाठी कोणीही मंदिराकडे येऊ नये. नागरिकांसह महिला, बंधू-भगिनी तसेच भाविक भक्तांनी यात्रा आहे म्हणून मंदिराकडे न येता घरीच नैवेद्य दाखवून देवीचे स्मरण करावे.
जागतिक महामारीचे हे संकट टळून सर्वांना सुखसमृद्धी व निरामय आरोग्य लाभावे यासाठी मंदिराकडे न येता व घरीच थांबून प्रार्थना करावी आणि प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन श्री पांडुरंग देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.