सातारा दि03 : ( अजित जगताप ) कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जनता कर्फ्यु झाल्यानंतर संचारबंदीची हट्रिक केली. या मध्ये सातारा शहरातील दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश दिला. त्यामुळे पेट शॉपी वर अवलंबून असलेल्या लाडक्या पाळीव प्राणी, पक्षी, रंगीत लहान मासे यांचे खाद्य पदार्थ मिळणे कठीण झाले आहे. या मुक्या जिवाची उपासमार होत असून या शॉपी ला काही काळ उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी काही प्राणी-पक्षी मित्रांनी केली आहे.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील कोरोना विषाणू संसर्ग मर्यादित ठेवण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा चांगल्या उपाय योजना सुरू करीत आहेत.त्यातून यापूर्वी काही वेळेसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली होती. पण, आता कोरोना प्रादुर्भाव अधिक दिसून येत असल्याने सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सर्वांच्या हिताचा असला तरी मानवता भावनेतून पाळीव मुक्या पक्षी, मासे,प्राण्यांसाठी पेट शॉपी काही अल्प काळासाठी उघडण्याची परवानगी दयावी अशी मागणी होत आहे.
साताऱ्यात अनेक कुटूंबातील घरात पाळीव कुत्रा, मांजर, लहान मासे, विविध प्रकारचे लहान पक्षी हौसेने पाळली जातात. या सर्वांची संख्या किमान दहा हजार इतकी आहेत. श्रीमंत वर्गांतील लोकांनी भरपूर प्रमाणात खाद्य पदार्थ साठा करून ठेवला असला तरी मध्यमवर्गीय लोकांना आर्थिक परिस्थिती शक्य नाही. त्यांच्यासाठी वेगळा पर्याय कोणता? याची माहिती नाही. त्यामुळे अनेकजण चिंतेत आहेत. काही शॉपी मध्ये असलेले रंगीत पक्षी, मासे वेळेत खाद्य पदार्थ न मिळाल्याने मरून पडल्याची भिती व्यक्त होत आहे.
लॉक डाउन ची शिक्षा त्यांना मिळू नये असे अनेकांना मनापासून वाटत असले तरी पेट शॉपी दुकाने उघडी ठेवणे काहींना ते कायद्याच्या विरोधात आहे असे वाटते. खरं म्हणजे याबाबत साताऱ्यातील प्राणी -पक्षी मित्र व संघटनेने आवाज उठवला पाहिजे अशी मागणी होत आहे. सदर दुकानात जास्त गर्दी होणार नाही. याची काळजी घेऊनच परवानगी दिली तर काही अंश पाळीव घटकांचा प्रश्न सुटू शकतो. ही सुद्धा अत्यावश्यक सेवा आहे. अनेकजण भटक्या प्राणी पक्षांना मोफत अन्न पदार्थ देत आहेत.ही दिलासा देणारी बाब आहे.
कॅट व डॉग फूड, बोन्स,कॅल्शियम कांडी, रंगीत मासे खाद्य व लव्ह बर्ड्स साठी राळ हे खाद्य पदार्थ पेट शॉपी मध्ये उपलब्ध आहे पण, विक्रीची परवानगी नाही. अशा खात्रीत पेट शॉपी व्यवसायिक अजित शिंदे, ऋतुजा परदेशी, कोलते व इतर व्यवसायिक सापडले आहेत.काही जण पाळीव प्राणी, मासे, पक्षी यांची मनापासून काळजी घेतात एवढंच नव्हे तर लॉक डाउन काळात लाडक्या कुत्र्याला बाहेर घेऊन जाता येत नाही. त्यामुळे त्याला डायपर घातले जाते.तसेच आजारी पडल्यास त्याची देखभाल करण्यासाठी सुध्दा खर्च करतात अशी माहिती डॉ अशोक गायकवाड यांनी दिली आहे.
साताऱ्यात किमान दोन किंवा तीन दिवसाचे अंतर ठेवून पेट शॉपी काही ठराविक वेळेसाठी उघडी ठेवावी .कारण हा पाळीव प्राणी, मासे, पक्षी यांच्या साठी भावनिक प्रश्न झाला आहे. तरी संबधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अटी व शर्ती च्या आधारावर तशी परवानगी दयावी अशी मागणी होत आहे.