पाटण:- ३४६ वा. छत्रपती शिवराज्याभिषेक दिन उत्साहपुर्ण वातावरणात शिवप्रेमी शिवमावळ्यांनी सुंदरगड (दात्तेगड) येथे साजरा केला. गड परिसरातील शिवमावळ्यांनी सकाळी भगवा ध्वज हातात घेऊन शिवगर्जनेत गडावर प्रवेश केला. यावेळी गड स्वच्छता, गडपुजन, व गडावरील देव – दैवतांची पुजा करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाअभिषेक घालण्यात आला व प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवमावळ्यांनी शिवगर्जना देऊन छत्रपती शिवरायांना वंदन केले.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर निसर्ग संपन्न परिसरात असलेल्या या किल्ल्यावर गड परिसरातील मावळ्यांसह व सुंदरगड (दात्तेगड) संवर्धन समितीच्या मावळ्यांनी ३४६ वा शिवराज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त गडावर सकाळ पासुनच हजेरी लावली. यावेळी मावळ्यांनी प्रथम गड स्वच्छता मोहीम राबवून गडपुजन, भगवा ध्वजपुजन करून ध्वजास मानवंदना दिली. तर गडावरील देवदैवतांचे पुजन करून, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. यावेळी उपस्थित मावळ्यांनी शिवप्रतिमेवर पुष्पवृष्टी करून शिवगर्जनेत छत्रपती शिवरायांचा जयजयकार केला. तर कोमल मांडवकर या शिवकन्येने शिवपवाडा गाऊन किल्ल्यावरील वातावरण मंत्रमुग्ध केले.
यावेळी शिवप्रेमी प्रा. मनोहर यादव, प्रा. यसुफ हकीम, योगेश नलवडे, लक्ष्मण चव्हाण, मंगेश मारसिंग यांनी आपले शिवविचार व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्षाने पावन झालेल्या प्रत्येक गडकिल्ल्यांचे संवर्धन करून आजच्या पिढीसमोर छत्रपतीचां इतिहास रुजवला पाहिजे. याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या किल्ल्यावर भगवा फडकविला त्या प्रत्येक गडकिल्ल्यांवर शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. सुंदरगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनास अविनाश पराडकर, आनंदा मोळावडे, शंकर मोहिते, सुशांत शिंदे, चंद्रकांत बामणे, किशोर थरवल, किसन मांडवकर, संतोष मारसिंग यांच्यासह गडपरिसरातील शिवमावळे, सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे उपस्थित होते.
सुंदरगडावर शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.
RELATED ARTICLES