पाटण:- कोरोनाचा दुसऱ्या टप्प्यात सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असताना जनतेच्या सुरक्षेतेसाठी शासनाने पुन्हा कठोर निर्णय घेऊन मिनी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र या लॉकडाऊनचा काडीमात्र फरक जनतेवर पडताना दिसत नाही. याचा प्रत्येअ पाटणच्या सोमवारच्या आठवडी बाजारात दिसून आला. नेहमी पेक्षा जास्तच गर्दी झाल्याने अखेर पोलिस यंत्रणेला भर उन्हात रस्त्यावर उतरावे लागले. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोकराव थोरात, पोलिस निरीक्षक एन.आर.चौखंडे व त्यांचे सहकारी यांना अख्खा पाटणच्या रस्त्यावर फिरुन नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचा व जिथे जास्त गर्दी झाली आहे तिथली दुकाने बंद करण्याच्या सूचना द्यावा लागल्या. अखेर सुरक्षेतेच्या कारणास्तव पोलिसांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. अशा प्रतिक्रिया सुज्ञ नागरीकांच्यातून निघाल्या..
दुसऱ्या टप्यातील कोरोनाने सगळीकडे हाहाःकार माजवला असताना दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना नागरिकांना गिळंकृत करत आहे. कोरोनाला शह देण्यासाठी शासन मोठ्याप्रमाणात लसीकरण कार्यक्रम वाढवत असलेतरी गुणाकाराच्या पट्टीने कोरोनाची लागण नागरिकांना होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली. तरीही जनता शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवून सैरभैर वागताना दिसत आहेत. याचा प्रत्येअ सोमवारी पाटणच्या आठवडी बाजारादिवशी पहायला मिळाला. पाटण शहरात भाजी मंडई सह सगळीकडेच नागरीकांची गर्दी उसळलेली दिसली. पाटण नगरपंचायतीचे कर्मचारी नागरिकांना वेळोवेळी गर्दी न करण्याच्या सूचना देत होते. मात्र नगरपंचायतीची यंत्रणा नागरिकांची गर्दी कमी करण्यास असफल झाली.
अशावेळेला दुपारच्या भर उन्हात उपविभागीय पोलिस अधिकारी अशोकराव थोरात, पोलिस निरीक्षक एन,आर, चौखंडे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस पाटणच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पाटण शहरातील भाजी मंडई, जुना स्टैंड परिसर, कराड – चिपळूण रोड, नवीन एस.टी. स्टैंड परिसर आणि झेंडा चौक ते लायब्ररी चौक या गर्दीच्या ठिकाणी फिरुन नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. जिथे जास्त गर्दी दिसेल तिथली दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या आणि गर्दीतील नागरिकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. अखेर नागरिकांच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव पोलिसांनी घेतलेला निर्णय योग्यच होता. अशा प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांनी दिल्या.