पाटण:- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पाटण ग्रामीण रुग्णालयात तालुका बाहेरील व परजिल्ह्यातील नागरिकांची गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गर्दी मुळे पाटण तालुक्यातील स्थानिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. याउलट बाहेरून आलेल्या नागरीकांमध्ये कोरोना पॉजिटिव्ह व्यक्ती असेल तर त्याचा संसर्ग येथील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवू शकतो.पाटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाला आता कुठे यश मिळत आसताना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. लसीकलणासाठी प्रथम प्राधान्य स्थानिकांना द्या. नाहीतर लसीकरण बंद करा. अशी मागणी येथील स्थानिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाटण ग्रामीण रुग्णालयात केली.
या बाबत दै. ग्रामोध्दारने शनिवार दि.- ८ मे च्या दिवशी शासनाच्या सावळ्या गोंधळामुळे स्थानिक नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहिल्याचे वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेत अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी शासनाच्या चुकीच्या ऑनलाइन नोंदणीवर नाराजी व्यक्त केली होती. तर पाटण ग्रामीण रुग्णालय येथे सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव जगताप, नितीन पिसाळ, शंकर मोहिते, विक्रांत कांबळे, लक्ष्मण चव्हाण, सुरेश संकपाळ, श्रीगणेश गायकवाड, संदिप भोळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कोरोना प्रतिबंधक लसीकलणासाठी प्रथम प्राधान्य स्थानिकांना देण्याची मागणी केली.
पाटण तालुका मुळात ग्रामीण, डोंगराळ असल्या कारणाने येथे अनेक बहुतांश ठिकाणी इंटरनेट सुविधांचा बोजवारा आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्यास इंटरनेटच्या अपुऱ्या सुविधांमुळे अनेकांची ऑनलाइन नोंदणी होतच नाही. यामुळे पाटण केंद्र लसीकरणासाठी ऑनलाइनला रिकामे दाखविले जात असल्याने या केंद्रावर तालुका बाहेरील व परजिल्ह्यातील नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी होत आहे. याचा फटका मात्र स्थानिकांना बसत असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दररोज लसीकरणासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. पाटण तालुक्यातील ४५ वर्षावरील अनेकांचे पहिला लसीचा डोस होऊन दिड महिन्याचा कालावधी संपत आला आहे. तर आनेकांचा संपला देखील आहे. अशा नागरिकांना प्रथम प्राधान्याने लसीचा दुसरा डोस देणे क्रमप्राप्त असताना शासनाच्या चुकीच्या ऑनलाईन नोंदणीमुळे ४५ वर्षावरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी रुग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
लसीकरणासाठी तालुक्यातील स्थानिकांनाच प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे.- तहसिलदार योगेश्वर टोंपे.
पाटण तालुका डोंगराळ आणि ग्रामीण आहे. येथे इंटरनेटच्या सुविधांचा अनेक ठिकाणी अभाव आहे. मोबाईल रेंजच्या कमीजास्त रेंजमुळे ऑनलाईन नोंदणीसाठी अडचणी निर्माण होत असून लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी होत नाही. याचा फायदा तालुका व जिल्हा बाहेरच्या लोकांना होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात ऑनलाईन नोंदणीची माहिती नसल्याने नागरिक पहिल्या सारखेच लसीकरणासाठी येत आहेत. या बाबत माझे वरिष्ठांशी व संबंधित विभागाशी बोलने झाले आहे. तालुक्यातील स्थानिक लोकांचे लसीकरण पुर्ण होण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत.