Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसह्याद्री व्याघ्रप्रकल्प मध्ये आढळला दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ ( बेडूक तोंड्या पक्षी)

सह्याद्री व्याघ्रप्रकल्प मध्ये आढळला दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ ( बेडूक तोंड्या पक्षी)

 

पाटण:- कोयना परिसर मध्ये असलेल्या जंगलामध्ये दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती, सरपटणारे प्राणी, किटक यांचे वास्तव्य हळूहळू समोर येत असून ग्रिफॉन गिधाड पाठोपाठ आता सापडला दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (बेडूक तोंड्या पक्षी) या दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तवांने पक्षीमित्रांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सहसा दिवसा नजरेस न पडणारा दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ ( बेडूक तोंड्या पक्षी )हा पहिल्यांदाच कोयना अभयारण्य तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोयना परीसरामध्ये पक्षी निरिक्षकांना आढळून आला.

कोयना परिसरातील स्थानिक व डिस्कवर कोयना टीम चे सदस्य पक्षी मित्र संग्राम कांबळे, निखिल मोहिते, नरेश शेलार, संकेत मोहिते, महेश शेलार शेतात शेतीचे कामे करत असताना आपला छंद जोपासत पक्षी निरिक्षणाचा अभ्यास करत असतात. शेतातील कामे करत असताना ते कॅमेरा देखील बरोबरच ठेवतात. अशातच गुरवारी संग्राम कांबळे, निखिल मोहिते आपल्या शेतात काम करत असताना संध्याकाळच्या वेळीला शेजारील जंगलातून अनोखा आवाज ऐकू आला. यावेळी आजूबाजूला त्यांनी शोध घेतला असता अथक परिश्रमाने त्यांना दुर्मिळ श्रीलंकन फ्रॉग माउथ (बेडूक तोंड्या पक्षी) झाडावर नजरेस पडला.
हा पक्षी निशाचर असून त्याचे शास्त्रीय नावं Batrachostomus moniliger असे असून तो खाद्य शोधासाठी रात्रीच बाहेर पडतो. दिवसा घनदाट जंगलात विश्रांती घेत असतो. साधारणपणे याच्या शरिराची लांबी २२ ते २३ सेंटीमीटर असते. कीटक हे त्याचे आवडते खाद्य आहे. नर पक्ष्याचा संपूर्ण शरीराचा रंग हा वाळलेल्या लाकडाच्या सालीसारखा राखाडी असतो. मादी ही बदामी रंगाची असते पंखाच्या बाजूने व पाठीमागे बदामी रंगावर पांढरे ठिपके असतात. बेडकाच्या तोंडासारखे तोंड असलेने त्याला मराठीत मण्डूक मुखी( बेडूकतोंड्या पक्षी) असेही म्हणतात. दिवसा सहसा नजरेस न पडणारा श्रीलंकन फ्रॉग माउथ या पक्षांचा रंग आणि आकार निसर्गाशी इतका मिळता जुळता आहे की, ते सहजपणे ओळखून येत नाहीत. तसेच हा निशाचर असुन खाद्यासाठी रात्री बाहेर पडतो आणि दिवसा आराम करतो. फ्रॉग माउथ हा वन्य जीवांच्या वर्गवारी मध्ये वन्यजीव कायदा 1972 (संरक्षण कायदा ) नुसार क्रमांक एकच्या वर्ग यादी मध्ये येतो, या वर्ग यादी मध्ये वाघ, अजगर, पीसोरी, शार्क, धनेश इत्यादी सारखे दुर्मिळ वन्यजीव येतात. पक्षी अभ्यासकांसाठी जगातील काही मोजक्याच जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील प्रदेश म्हणून गणलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र राखीव हे जंगल पक्ष्यांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे, हे यावरुन पुन्हा एकदा स्पष्ट होते.

कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्रप्रकल्प वन्यजीव प्राणी, पक्षी यांच्यासाठी राखीव असल्याने येथे अनेक प्राणी, पक्षी संशोधक येतात व स्थानिकांच्या मदतीने ते संशोधन करतात. अशा संशोधनाची हळू हळू येथील स्थानिक तरुणांना आवढ निर्माण झाल्याने त्यांनी एकत्र येऊन डिस्कवर कोयना टीमची निर्मिती केली. व सह्याद्री सोशल फौंडेशन संस्थेमार्फत अशा प्रकारचे संशोधन, निरीक्षण, अभ्यास स्वता: करू लागले. त्याचाच प्रत्यय म्हणजे त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वन्यजीवांच्या नोंदी. या अगोदर डिस्कवर कोयना टीम ने केरळराज्याचे राज्य फुलपाखरू “मलबार ब्रँडेड पिकॉक” याचे वास्तव्य, अतिशय दुर्मिळ असे “Mountain Imperial Pigeon” (राजकपोत) या पक्ष्याची देखिल नोंद केली होती.
डिस्कवर कोयना टीम नेहमीच वेगवेगळ्या संशोधना मध्ये, निसर्ग पर्यटन, वणवा निर्मूलन, सापा विषयी जन जागृती, स्थानिक पातळीवरील विषयात अग्रेसर असून वन विभागाच्या अधिकार क्षेत्राखाली येणाऱ्या गोष्टी साठी वनविभागाच्या कोयना, चांदोली च्या स्थानिक अधिकारी वर्गाच्या संपर्कामध्ये राहून कार्य करत असते. भविष्यात कोयना भागातील वन पर्यटन हें नक्कीच जागतिक दर्जाचे होईल असे डिस्कवर कोयना आणि सह्याद्री सोशल फौंडेशन संस्थे मधील संग्राम कांबळे , निखिल मोहिते , महेश शेलार , संकेत मोहिते , नरेश शेलार ,सागर जाधव , क्षितिज कांबळे , स्वप्नील पाटील क्रूणाल कांबळे या सदस्यांनी सांगितले .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular