मेढा प्रतिनिधी – बळीराजाचा आवडता बेंदुर सण आला असून आपल्या सर्जा राजा ची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्याकरिता मेढा आणि परिसरात साहित्य खरेदी करणेकामी बळीराजाची गर्दी होत आहे.
बळीराजाला साथ देणारे बैल काबाडकष्ट करतात, उन्हातान्हांत राबतात तेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. बेंदुर दिनी सकाळीच बैलांना नदीवर घेऊन जाऊन त्यांची आंघोळ घातली जाते,अंगाला हिंगुळ आणि शिंगांना रंग लावला जातो, अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात घुंगरुंच्या आकर्षक माळा घालून बैलांना सजवले जाते. संपूर्ण गावांत बैलांच्या जोड्या वाजत-गाजत मिरवल्या जातात.
आपल्या या लाडक्या जोडीला एक दिवस आराम देवून त्यांच्या विषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न बळीराजा कडून केला जातो.