भुईंज : आज पर्यंतच्या माझ्या वाटचालीत राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने उभे राहताना, चालताना आणि मोडीत निघतानाही पाहिलेले आहेत. मात्र, मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टी आणि कल्पकतेतून किसन वीर साखर कारखान्याची अल्पावधीत झालेली चौफेर प्रगती अधोरेखित करण्यासारखी आहे, असे प्रतिपादन पुणे येथील चिंतन ग्रुपचे चेअरमन अभिनंदन थोरात यांनी केले.
हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा स्मृतिदिन आणि कृषिदिन किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. निलिमा भोसले, अॅड. विजयराव कणसे, भैय्यासाहेब जाधवराव, पंचायत समिती सदस्य कुमार बाबर, चिंतन ग्रुपचे संतोष डिंगणकर, भूषण रेगे, वाई तालुका कृषी अधिकारी श्री. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचे सभासद प्रताप देशमुख यांनी प्रास्ताविक करून अभिनंदन थोरात यांचा परिचय करून दिला. प्रारंभी अभिनंदन थोरात यांच्या हस्ते विविध फळझाड रोप विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करून कृषीदिन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी कारखान्याचे कारखान्याचे संचालक सीए सी. व्ही. काळे यांची वाई अर्बन बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि रतनसिंह शिंदे यांची ओम दत्त चैतन्य अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याच्या समुह जनता अपघात विमा योजनेंतर्गत श्रीमती यशोदा कदम (पिंपोडे खुर्द), श्रीमती विद्या भोईटे (वाघोली), श्रीमती शंकर भगणे (कडेगाव) या मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश अभिनंदन थोरात यांच्या हस्ते देण्यात आला. स्वागत संचालक नंदकुमार निकम यांनी केले. सुत्रसंचालन दत्तात्रय शेवते यांनी केले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले.