पल्लीकल : कुशल मेंडिसच्या नाबाद दीडशतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकेने पहिल्या कसोटीच्या तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले. तिसऱया दिवसअखेर लंकेने 6 बाद 282 धावा केल्या होत्या. लंकेकडे आता 196 धावांची आघाडी असून अजून त्यांचे चार गडी खेळण्याचे शिल्लक आहेत. कुशल मेंडिस (169) व दिलरुवान परेरा (5) धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, यजमान श्रीलंकेने 1 बाद 6 धावसंख्येवरुन तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. पहिल्या षटकांतील पाचव्याच चेंडूवर करुणारत्नेला शुन्यावर स्टार्कने पायचीत करत लंकेला दिवसातील पहिला धक्का दिला. सलामीवीर कौशल सिल्वाही (7) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार मॅथ्यूजला (9) धावांवर लियॉनने बाद करत लंकेची 4 बाद 86 अशी बिकट अवस्था केली होती. पण, कुशल मेंडिस व दिनेश चंडिमल यांनी पाचव्या गडयासाठी 117 धावांची भागीदारी साकारत संघाचा डाव सावरला.
मेंडिसने शानदार दीडशतक झळकावताना 243 चेंडूत 20 चौकार व 1 षटकारासह नाबाद 169 धावा केल्या. मेंडिसच्या या धमाकेदार खेळीमुळे लंकेला भक्कम आघाडी घेता आली. दिनेश चंडिमलने त्याला चांगली साथ देताना 100 चेंडूत 4 चौकारासह 42 धावांचे योगदान दिले. चंडिमल बाद झाल्यानंतर सिल्वासोबत सहाव्या गडयासाठी मेंडिसने 71 धावांची भागीदारी करत संघाला अडीचशेपर्यंत मजल मारुन दिली. सिल्वाने 36 धावा केल्या. त्याला लियॉनने बाद केले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे तिसऱया दिवसाचा खेळही लवकर थांबवण्यात आला. दिवसअखेरीस यजमान श्रीलंकेने 80 षटकांत 6 बाद 282 धावा केल्या होत्या. लंकेकडे आता 196 धावांची आघाडी असून अजून त्यांचे चार गडी खेळायचे आहेत. कुशल मेंडिस 169 व दिलरुवान परेरा 5 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्क व नॅथन लियॉनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मार्शने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका प.डाव 117 व दु.डाव 80 षटकांत 6 बाद 282 (कुशल मेंडिस खेळत आहे 243 चेंडूत नाबाद 169, दिनेश चंडिमल 100 चेंडूत 42, सिल्वा 62 चेंडूत 36, परेरा खेळत आहे 5, नॅथन लियॉन 2/98, मिचेल स्टार्क 2/44, मिशेल मार्श 1/33).