Friday, March 28, 2025
Homeकरमणूकमराठी पताका फडकविण्यासाठी रिओफत धावणार ललिता बाबर

मराठी पताका फडकविण्यासाठी रिओफत धावणार ललिता बाबर

 

कोल्हापूर : रिओ ऑलिम्पिकसाठी 28 भारतीयांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये पात्रता मिळवली असली तरी यात मराठी नावे दोनच आहेत. ललिता बाबर आणि कविता राऊत-तुंगार. या दोन रणरागिणींनी रिओच्या दरवाजावर धडक मारली आहे. त्यापैकी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर ठरलेली ललिता 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे.

माणदेशी एक्स्प्रेसफ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ललिता शिवाजी बाबरचा जन्म सातारा जिल्ह्यातील मोही (ता. माण) या छोट्याशा गावात झाला. दुष्काळाचं रणरणतं लेणं कपाळावर गोंदलेल्या या गावात ललिताचं बालपण काट्याकुट्यातून पळण्यात गेलं, पण हीच काट्याकुट्याची वाट तिला रिओफच्या ट्रॅकवर घेऊन गेली. 2005 साली पुण्यात झालेल्या 20 वर्षांखालील राष्ट्रीय र्स्पर्धेत तिने पहिले सुवर्णपदक जिंकले. 2014 मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये हॅट्ट्रिक नोंदविल्यानंतर ललिताने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्यादृष्टीने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात करिअर करायचा निर्णय घेतला. या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स खेळाडूने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन आतापर्यंत 23 पदके मिळविली आहेत. त्यामध्ये 8 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे.

तिने चीनमधील वुहानमध्ये झालेल्या 21 व्या अ‍ॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये 9.34.13 वेळ नोंदवून आशियाई व राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळविले होते. 2014 मध्ये 17 वी आशियाई क्रीडा स्पर्धा इंचिओन (दक्षिण कोरिया) येथे झाली. त्या स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेसमध्ये कांस्यपदक मिळविले होते. यावेळी तिने 9.35.37 अशी वेळ नोंदवली. या स्पर्धेत तिने सुधा सिंगचा विक्रम मोडला होता, पण या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बहारीनची रुथ जेबेट ही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने ललिताचे कांस्य रौप्यपदकात बदलले.

व्हिएतनाममधील 2009 च्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत व 2010 च्या दिल्ली येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सहभाग घेतला. 2012 पासून मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ती विजेतेपद मिळवित आहे. जानेवारी 2015 मधील या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. याशिवाय भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने 2011 मध्ये 3 हजार मीटर धावताना कांस्यपदक मिळविले.

2015मध्ये बीजिंग येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ललिताने 9.27.86 अशी वेळ नोंदवून ऑलिम्पिक पात्रता मिळवली. या शर्यतीत ती अंतिम फेरीत आठवी आली असली तरी अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या स्पर्धेत नोंदवलेली वेळ तिने दिल्ली येथे एप्रिल 2016 मध्ये झालेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मागे टाकून 9.27.09 अशी नवी वेळ नोंदवली. आता तिचे लक्ष्य आहे ते ऑलिम्पिक पदकाचे. हे स्वप्न पूर्ण करून ती रिओ ऑलिम्पिकमध्ये मराठी पताका फडकावेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही !

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular