कराडः देश व राज्यात जणू सुपर भांडवलदारशाहीचा वावर वाढताना दिसत आहे. स्वातंत्र्यात जगणाऱया लोकशाहीमध्ये हुकूमशाही राजवटीमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. या विरोधात पेटून उटण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी सांगलीतील जनआक्रोश मेळाव्यात उस्फूर्तपणे सहभागी होऊन तो यशस्वी करुया, असा निर्धार काँग्रेसचे नेते डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी व्यक्त केला.
बुधवारी आठ नोव्हेंबरला सांगली येथे होणाऱया जनआक्रोश मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये कराड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
आ. आनंदराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील-चिखलीकर, सुनिल पाटील, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उत्तरचे अध्यक्ष अविनाश नलवडे, शहर अध्यक्ष प्रदिप जाधव, मलकापूर शहर अध्यक्ष राजेंद्र यादव, नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पासाहेब माने, राजेंद्र डुबल, झाकीर पठाण, शिवाजीराव मोहिते, दुर्गेश मोहिते, उमेश साळुंखे, हेमंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या सौ. मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, सदस्या नंदाताई यादव, वैशाली वाघमारे, विद्याताई थोरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मोहिते म्हणाले, सरकारने नोटाबंदी व जीएसटीच्या माध्यमातून सामान्य जनतेला नाहक त्रास दिला आहे. त्याविरोधात पेटून उठले पाहिजे. पुंजीवादी विचारांच्या प्राबल्यामुळे सामान्य माणूस आणि भांडवलदार यांच्यामधील दरी वाढत चालली आहे. सरकारची अर्थिक धोरणे सामान्य माणसांना विचारात घेवून चाललेली नाहीत. याचा प्रत्यय आपणास कर्जमाफीच्या चालढकलीवरुन दिसत आहे. पुंजीवादी विचारांमुळे शेतकरी व असंघटीत जनतेला गुलामगिरीत रहावे लागत आहे. त्या विरोधात होणाऱया सागंलीमधील जनआक्रोश मेळाव्यास कराड तालूक्यातील जनतेने बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करत आंदोलनामध्ये नेतृत्व करणारे पृथ्वीराज बाबा हे आपल्या तालूक्याचे सुपुत्र आहेत. त्यांची प्रतिमा उंचावेल इतका जनसमुदाय कराडमधून नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत, असे ते शेवटी म्हणाले.
आ. आनंदराव पाटील म्हणाले, भाजपच्या विरोधात देशातील जनता आक्रमक झाली आहे. त्याचा परिणाम गुजरातच्या निवडणूकीमध्ये दिसेल. सांगलीतील जनआक्रोश मेळाव्यासाठी जिल्ह्यातून हजारो लोकं उस्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. या सरकारने शेतकऱयांची चेष्टा चालवली आहे. त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. मेळाव्यातून आपला राग व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपला आक्रोश यशस्वी करुया. अजितराव पाटील, मनोहर शिंदे, अविनाश नलवडे यांची भाषण झाले. विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक लिमकर, दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन पाटील, वडगाव हवेलीचे माजी उपसरपंच संतोष जगताप, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.