सातारा : गेल्या आठवड्यापासून सातारा जिल्ह्यात कायद्याच्या जागृतीसाठी अगदी तालुका स्तरापर्यंत जिल्हा विधी प्राधिकरणाने वकिलांच्या साह्याने आणि विधी विद्यार्थ्याना सोबत घेवून काम केले ते अतिशय कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
जिल्हा विधी प्राधिकरणाकडून गेल्या 9 नोव्हेंबर रोजी जनजागृती सप्ताहाची सुरुवात झाली आणि त्याचा समारोप जिल्हा न्यायालयात झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा न्यायालयाचे प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा, बी. टी.सानप, जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव वर्षा पारगावकर उपस्थितीत होते.
या मागच्या सप्ताहात न्यायाधीश लढ्ढा यांनी 7,500 एवढ्या प्रकरणाचा निपटारा केला. हे काम खुप मोठं आहे. न्यायालय आणि कायद्याच्या जागृतीचे काम सर्व सामान्यांच्या दारापर्यंत नेण्याचे मोठे काम विधी प्राधिकरण करत आहे. हे खुप कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.
9 नोव्हेंबरपासून जिल्हा विधी प्राधिकरणाने कोण-कोणते कार्यक्रम राबविले, तालुका पातळीवर रॅली काढून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता विधी स्वयंसेवकानी घरोघरी जावून कायद्याचे महत्व पटवून देणारी माहितीपत्रके वाटले. वेगवेगळ्या कायद्यांच्या जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. आकाशवाणीवरुन मुलाखत देवून जागृतीचे काम केल्याचे विधी प्राधिकरणाच्या सचिव वर्षा पारगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी या जनजागृती सप्ताहात चांगले काम करणार्या वकिलांचे, विद्यार्थ्यांचे प्रमाण देवून गौरव करण्यात आला.