सातारा : राज्य-देशाच्या जडणघडणीत ज्यांनी संघर्ष करून रूढी-परंपरांना फाटा देत नावविचारांचा जागर केला त्यांच्या जन्मोत्सवाचे औपचारिक सोहळे करण्यापेक्षा विचारांचा जागर करावा. क्रां. सावित्रीमाई फुलेंच्या संघर्षामुळे महिला शिक्षित झाल्या. त्यांचा जन्मदिवस स्त्रीमुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी नायगाव, ता. खंडाळा येथे होणारा कार्यक्रम व्यापक दृष्टीकोन ठेवून व्हावा. यासाठी क्रां. सावित्रीमाई समारोह समिती स्थापन करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवावी. तसेच जिल्ह्यातील बचतगट, सेवाभावी संस्था, उद्योजिका आणि विविध क्षेत्रात सावित्रीमाईच्या विचारांवर काम करणार्या महिलांचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी दलित महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी कैलास शिंदे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, सालाबादप्रमाणे 3 जानेवारी रोजी नायगाव, ता. खंडाळा येथे होणारा क्रां. सावित्रीमाई फुले यांचा जयंती सोहळा व्यापक प्रमाणात साजरा करावा. शिक्षण क्षेत्रातील खरी क्रांती फुले दांपत्यामुळे झाली. सावित्रीमाईचा संघर्ष मोठा आहे पण बा जोतीबाने दिलेल्या कृतीशील सक्रीय योगदानामुळेच महिला शिक्षणाची ज्योत पुरोगामी महाराष्ट्रात तेवत आहे. समस्त महिलांसाठी हा क्षण अविस्मरणीय असून जिल्ह्यातील बहुतांश महिला सावित्रीमाई विचारांच्या प्रेरक म्हणून कृतीशील काम करतात. त्यामुळे अशा महिलांचा गौरव नायगावच्या भूमीत व्हावा. शाळा आणि स्मारक येथे मंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम काही वेळचा असतो. दुर्दैवाने प्रत्येकवर्षी नाममात्र महिला सक्रीय कार्यक्रमात सहभागी असतात. हे चित्र बदलले पाहिजे. याकरिता प्रशासनाने ठोस कृतीशील कार्यक्रम अंमलात आणावा. पर्यायी सावित्रीमाई सामोरोह समितीच्या माध्यमातून कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करावी. महिला व बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या महिला असल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाची उंची आणि व्याप्ती वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे अॅड. देशपांडे यांनी मुख्याधिकारी कैलास शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अॅड. शैला जाधव, स्वाती बल्लाळ आणि महिला उपस्थित
मुख्याधिकार्यांना महिला संघटनेचे साकडे ; नायगावचा सोहळा औपचारिकता नको व्यापक हवा
RELATED ARTICLES