महाबळेश्वर : थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरमध्ये थंडीची तिव्रता वाढू लागली आहे व नाताळ व नविन वर्षांच्या स्वागतासाठी येथे पर्यटक गर्दी करु लागले आहेत. यामुळे या हंगामात येथे तरुण तरणाई मौज मजा लुटण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात येत असतात. सध्या महाबळेश्वर येथे वन विभागाने वन सौंदर्याला अनेक पर्यटक कचरा करुन, वन्य जिवांना त्रास होणारी बाधा निर्माण करीत असल्याने सुर्यास्तानंतर वन हद्दीत प्रवेशासाठी अनेक पॅाईंट बंद करण्यात येत असतात. याबाबत अनेक ठिकाणी वन विभागाने सुचना फलक लावून देखिल त्याची कोणतिही परवा न करता अनेकांकडून कायद्याचे उल्लंघन केले जात असते. याच नियमांचा भंग करुन नुकतेच येथिल लिंगमळा धबधबा परिसरात रात्री उशिरा मद्य पिल्याने व वन हद्दीत बेकायदेशीक्षपणे प्रवेश केल्याने 9 युवक व 2 मुलींवर वन विभागाने व पोलिस प्रशासनाने कायदेशिर कारवाई केली. ही कारवाई रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत सुरु होती.
महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाते. या परिसरात पर्यटक नेहमी मौज मजा करण्यासाठी येत असतात. नुकतीच येथिल प्रसिध्द असलेल्या लिंगमळा परिसरात रात्री उशिरा फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची दिवदमन पासिंगची दोन वाहने क्रमांक डि.डि.03 के 0327, डि.डि. 03 जे 2444 व एम.एच. 16 बी.वाय. 3625 ही वाहने येथिल वाहनतळावर आढळून आली. वन विभागाने या परिसरात या बेवारस वाहने आढळल्याने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू या परिसरात कोणीही आढळून न आल्याने वन क्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी पोलिसांना माहिती दिली.
वन विभागाच्या कर्मचार्यांनी येथिल ट्रेकर्सच्या पथकाला मदतीसाठी पाचारण केले. पोलिस निरिक्षक नाळे देखिल त्वरित पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे लिंगमळा परिसरात मोठी गर्दी जमली व त्यांनी या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी सर्च लाईट घेऊन संपुर्ण जंगल परिसरात शोधमोहिमेस सुरुवात केली. लिंगमळा धबधब्याजवळील वरच्या बाजूच्या छोट्या धबधब्याच्या वरच्या बाजूच्या मोकळ्या घनदाट जंगल परिसरात हे पर्यटक शेकोट्या पेटवून थंडीची मजा लुटताना आढळले. वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांनी आकाश महाबळ (वय 23, मिरज), संभाजी गाडे (वय 24, नगर), हर्षल पटेल (वय 24, मुंबई), हेमचंद्र शहा (वय 24, मुंबई), प्रियंक पटेल (वय 25, मुंबई), ऋषिकेश गाडे (वय 24, नगर), शुभम जिने (वय 24, नगर), उमंग पटेल (वय 24, मुंबई), चांद पटेल (मुंबई) या तरुणांवर भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत वन हद्दीत बेकायदेशीर पणे प्रवेश करण्याचा गुन्हा दाखल केला. त्यांनतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या तरुणांनी मादक पदार्थांचे सेवन केले आहे का, याची तपासणी रुग्णालयात करण्यात आली. यापैकी आठ तरुणांनी मद्याचे सेवन केले होते पण ते मद्यार्कांच्या अंमलाखाली नव्हते, असा अभिप्राय वैद्यकीय अधिकार्यांनी दिला. या तरुणांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम 110-117 अंतर्गत कारवाई झाली आहे. त्यांना आज महाबळेश्वरच्या न्यायालयात हजर केले. पोलिस विभागाच्या आरोपात त्यांना प्रत्येकी 1000 दंड न्यायालयात ठोठावण्यात आला. आरोपींच्या वतीने अॅड. संजय जंगम यांनी काम पाहिले. दरम्यान न्यायालयाने वन विभागाच्या पुढिल चौकशी साठी आरोपिंना वन विभागाच्या ताब्यात दिले. तर, वन विभागाच्या कारवाईत त्यांना वन विभागाने प्रत्येकी 5000 रुपये दंड करुन ताकिद देऊन सोडून देण्यात आले अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रणजित गायकवाड यांनी दिली.