कोरेगाव, (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. वर्षा घोरपडे यांचे पती व राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते विकास घोरपडे यांनी शुक्रवारी सकाळी पंचायत समिती कार्यालयात जाऊन कनिष्ठ सहाय्यक प्रमोद शेलार यांना शिवीगाळ व धक्काबुकी केली. आमच्या गावातील प्रस्ताव वेळेत का सादर करत नाही, याचा जाब त्यांनी विचारला आणि त्यातून हा प्रकार घडला. या प्रकारानंतर कर्मचार्यांनी तातडीने लेखणीबंद करत कार्यालयासमोर निदर्शने केली. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष काका पाटील यांनी सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे यांच्यासह सदस्य व अधिकार्यांकडे घडल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी झालेल्या चर्चेतून अखेरीस विकास घोरपडे यांनी लेखी माफीनामा दिल्यानंतर वाद संपुष्टात आला आणि कर्मचार्यांनी कामकाज सुरु केले.
भाडळे खोर्यातील हासेवाडी येथील श्रीमती अरुणा घोरपडे यांनी पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते विकास घोरपडे हे पाठपुरावा करत होते. शुक्रवारी सकाळी काही मोजक्या कार्यकर्त्यांसह घोरपडे हे पंचायत समिती कार्यालयात गेले होते. ते थेट प्रमोद शेलार यांच्या टेबलाजवळ गेले आणि त्यांनी प्रस्तावाबाबत विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यामध्ये वादावादीस सुरुवात झाली. घोरपडे यांनी रागाच्या भरात शिवीगाळ करत शेलार यांना धक्काबुकी केली.
शेलार यांनी घडला प्रकार आपल्या वरिष्ठांसह कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष काका पाटील यांना सांगितला. त्यानंतर सर्व कर्मचार्यांनी लेखणीबंद करत कार्यालयाच्या प्रांगणात निदर्शने केली. काका पाटील हे काही वेळातच कोरेगावात आले आणि त्यांनी थेट सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, गटविकास अधिकारी सौ. सावित्री खर्डे यांच्यासह सदस्य व अन्य अधिकार्यांशी चर्चा केली. शेलार यांच्याबाबतीत घडलेला प्रकार चुकीचा आहे, असे प्रकार घडू नयेत, असे मत व्यक्त केले. घोरपडे यांच्याकडून तिसर्यांदा असा प्रकार घडल्याचे स्थानिक अधिकार्यांनी सांगितले. सर्व चर्चेनंतर सभापती जगदाळे यांनी झाला प्रकार चुकीचा असून, गैरसमजुतीतून घडला असल्याचे सांगत घोरपडे हे माफीनामा देत असल्याने आता हा विषय थांबवावा, असे नमूद केले. दरम्यानच्या काळात घोरपडे यांनी लेखी माफीनामा दिल्यानंतर हा वाद संपुष्टात आला आणि कर्मचार्यांनी कामकाज सुरु केले.