Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमेढा ग्रामीण रुग्णालय होणार जिल्ह्यातील सुसज्ज रुग्णालय ; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे उर्वरीत इमारत...

मेढा ग्रामीण रुग्णालय होणार जिल्ह्यातील सुसज्ज रुग्णालय ; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे उर्वरीत इमारत बांधकामाला मंजूरी

साताराः  जावली खोर्‍यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील लोकांना जवळच्या जवळ दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून जावली तालुक्याचे मुख्य आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मेढा गावात 10 बेडसह शस्त्रक्रीया खोली असलेले ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले होते. मात्र, जावली तालुक्याचा विस्तार पाहता आणखी 20 बेडसह सुसज्ज आणि सर्व सोयीनी युक्त रुग्णालय असावे, ही गरज ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाठपुरावा करुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरीत इमारत बांधकामासाठी 2 कोटी 73 लाख 52 हजाराचा निधी मंजूर करुन घेतला असून लवकरच मेढा ग्रामीण रुग्णालय हे जिल्ह्यातील एक सुसज्ज ग्रामीण रुग्णालय ठरणार आहे.
जावली तालुका म्हणजे अतीदुर्गम आणि डोंगराळ भाग. या तालुक्यात दुर्गम आणि डोंगराळ भागात लोकवस्ती आहे. या अतीदुर्गम आणि डोंगराळ भागातील जनतेला तत्काळ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून मेढा ग्रामीण रुग्णालयात मुख्य इमारत, 10 बेड आणि ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले होते. जावली तालुक्याच्या गरजेनुसार 10 बेड खूपच कमी होते. त्यामुळे आणखी 20 बेड, सुसज्ज इमारत, ऑपरेशन थिएटर आणि इतर सर्व सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला शासनाने नुकतीच मंजूरी दिली असून मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरीत बांधकामासाठी व इतर सोसायीसुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल 2 कोटी 73 लाख 52 हजाराच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
मान्यताप्राप्त 2 कोटी 73 लाख 52 हजार या निधीतून मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य  इमारतीचे बांधकाम करणे, अतिरिक्त 20 बेड, शवविच्छेदन खोली, रुग्णवाहिका खोली, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रांती खोली आणि निवास व्यवस्था यासह अंतर्गत रस्ते करणे, रुग्णालयातील फर्निचर करणे, वाहनांसाठी पार्किंग शेड, जनरेटर, बोरवेल आणि पाणी साठवण टाकी बांधणे, परिसरातील पथदिवे बसवणे या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निविदा प्रक्रीया राबवून त्वरीत मेढा ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरीत बांधकामास प्रारंभ करावा, अशी सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधीत अधिकार्‍यांना दिली आहे. दरम्यान, मेढा रुग्णालयात अतिरिक्त 20 बेड आणि इतर आरोग्यविषय अत्यावश्यक सर्व सेवा लवकरच उपलब्ध होणार असून हे रुग्णालय जावली तालुक्याची आरोग्य वाहिनी ठरणार आहे.
अतिशय जिव्हाळ्याचा आणि आरोग्याचा प्रश्‍न आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मार्गी लावल्याबद्दल जावली तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular