सातारा : सातारा पालिकेत तीन वर्षापूर्वी झालेल्या बोगस सफाई कर्मचारी प्रकरणाचा गुरुवारी पर्दाफाश झाला. नगरविकास संचालनालयाने या प्रकरणाचा खुलासा मागणारे दहा महिन्यापूर्वी पाठवलेले पत्र प्रशासनाने जाणीवपूर्वक फाइंलबंद ठेवले याचा रहस्यभेद माजी सभापती वसंत लेवे यांनी सर्वसाधारण सभेत करत सातारा विकास आघाडीला घरचा आहेर दिला.
34 विषयांना तब्बल 14 उपसूचना आणि मतदानाला पडलेले सहा विषय या कायद्याच्या काथ्याकूटीत जानकर कॉलनीत नळ कनेक्शन देण्याचा विषय रद्द करण्यात आला. वारसा हक्काच्या भरतीवर पुन्हा समिती नेमण यांचा फार्स करण्यात आला. दीडशे वर्षाच्या इतिहासात तैनात पोलीस बंदोबस्तात प्रथमच सभा खेळीमेळीत पार पाडली. दि 2 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरविकास आघाडी व सातारा विकास आघाडी यांच्या नगरसेवकांमध्ये राडा झाला होता. त्यावेळी दंडेलशाहीने मंजूर करण्यात आलेल्या विपा यांच्या कार्यवृतांताला नविआ व भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. 21 विरूध्द 14 मतांनी हा विषय फेटाळण्यात आला सुवर्ण जयंती रोजगार योजनेअंर्तगत सातारा शहरातील प्रमुख पाच रस्त्यांचे क्राँक्रिटीकरणच्या विषयावर सुद्धा प्रचंड खल झाला. शहरात 50 लाख रुपयांचे सर त्यांचे डांबरीकरण झाले त्याचे काय? असा प्रश्न अशोक मोने यांनी उपस्थित केला. यावेळी भाजप गटनेते धनंजय जांभळे यांनी दोन तारखेच्या सभेचा मुद्दा उपस्थित करताच साविआची मंडळी त्यांच्यावर शरसंधान करत तुटून पडली.
सातारा शहरात मोकळ्या संकुलाची गर्दी
सातारा शहरात गेल्या चार वर्षात सात व्यापारी संकुले बांधून रिकामी पडली त तरी सदर बझार व सोमवार पेठ येथे पुन्हा व्यापारी संकुले बांधण्याच्या व्यवस्थापनाच्या तयारीवर अशोक मोने व सिध्दी पवार यांनी आक्षेप घेतला . सातारा कॉम्प्लेक्स शहर बनायला लागले पण त्याचा पालिकेला उपयोग नाही असा टोला पवार यांनी लगावला अशोक मोने यांनी सदर बझार च्या व्यापारी गाळ्यात मंडई तर सोमवार पेठेत कस्तुरबा रूग्णालयाच्या इमारतीत सुविधा उपचार केंद्र कायम स्वरूपी चालावे अशी सूचना केली.
बोगस कर्मचारी भरती आणि समितीचा फार्स
माजी नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या काळात 69 सफाई कर्मचारी भरती झाली. यावेळी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्याची चौकशी नगर परिषद संचालनालयाने लावली त्या पत्राचा गौप्यस्फोट माजी सभापती वसंतलेवे यांनी केला. आणि पुन्हा 24 आरोग्य कर्मचारी भरतीचा विषय कसा पुढे आला असा लेवे यांनी घरचा आहेर देताच गोंधळ झाला. आस्थापना प्रमुख अरविंद दामले यांना उत्तरे देताना प्रचंड दमछाक झाली. या प्रकरणाची चौकशी करा आणि अहवाल सादर करा अशी मागणी करणारे पत्र 24 फेब्रुवारी 2017 रोजी नगर परिषद संचालनालयाने पाठवले होते. ते पत्र तब्बल दहा महिने फाईल बंद ठेवण्यात आले. त्याचा रहस्य भेद लेवे यांनी करत ते पत्र सभा सचिवांना आग्रहाने वाचायला लावत सावि आला घरचा आहेर दिला. सावि आने रागरंग बघून समिती नेमण्याचा पवित्रा घेतला आणि पुढच्या सभेत अहवाल सादर करण्याचा फार्स करत वेळ मारून नेली.
13 उपसूचना 6 विषयांवर मतदान
सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात झालेली सभा पावणेतीन वाजता संपली . 34 विषयांना 13 उपसूचना मांडल्या गेल्या. सहा विषय मतदानाला पडले. चार विषय बहुमताच्या जोरावर मंजूर झाले. जानकर कॉलनीत नळ कनेक्शन देण्याचा विषय नामंजूर करण्यात आला.
निशांत पाटील यांची प्रतोद गिरी
पक्ष प्रतोद पदाची जवाबदारी स्वीकारल्यावर पहिल्या च सभात निशांत पाटील यांनी तुफान बँटिंग केली. तसेच विकास कामांमध्ये कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना विकास कामात सामावून घेतले जाईल असे आश्वासन निशांत पाटील यांनी दिले. आपल्या मिश्किल शैलीने पाटलांनी सभागृहात वातावरण हलकेफुलके ठेवले. मागील सभेतील धरपकडीचा अनुभव लक्षात घेता सभागृहाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र कोणताही अनुचित प्रकार सुदैवाने घडला नाही. सभेच्या काळात नगराध्यक्षा माधवी कदम यांनी रजा घेतल्याने उपनगराध्यक्ष राजू भोसले यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळाला.
(छाया : प्रमोद इंगळे)