Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीहॉस्पिटलचा जैविक कचरा ओढ्यात ; शेंद्रे ग्रामपंचायतीने पाहणी करून केला पंचनामा

हॉस्पिटलचा जैविक कचरा ओढ्यात ; शेंद्रे ग्रामपंचायतीने पाहणी करून केला पंचनामा

सातारा : शेंद्रे, ता. सातारा येथील अँन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटलचा जैविक कचरा लगतच्या ओढ्यात आढळून आल्याने शेंद्रे ग्रामपंचायतीने पाहणी करून याबाबतचा पंचनामा केला आहे. या संदर्भाने पंचायतीने प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग यांच्याकडे तक्रार केली असून हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
शेंद्रे येथे महामार्गाजवळच अँन्को लाईफ हे कॅन्सरवर उपचार करणारे मोठे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलजवळूनच शिवेचा ओढा नावाचा ओढा जातो.गेल्या काही महिन्यांपासून या हॉस्पिटलचे सांडपाणी कोणतीही फिल्टर प्रक्रिया न करता थेट या लगतच्या ओढ्यात सोडले जाते.तसेच या हॉस्पिटलमधील वापरले जाणार्‍या वेस्टेज मटेरियलही याच ओढ्यात टाकले जाते. हा प्रकार रात्रीच्या वेळी केला जातो.हॉस्पिटलच्या सांडपाण्यामुळे या ओढ्याचे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त झाले आहे.तसेच या ओढ्यात वापरलेल्या सिरिन्ज, प्लास्टिक बॉक्स, जखमेवर वापरलेल्या पट्ट्या असा कचराही टाकला जातो.
हा शीवेचा ओढा शेंद्रे गावाजवळील भोसलेवाडी वस्तीच्या पाणी पुरवठा विहिरीच्या जवळून जात पुढे उरमोडी नदीला मिळतो.त्यामुळे या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे सार्वजनिक विहिरीचे पाणीही दूषित होत आहे. उरमोडी नदीवर शेंद्रे, वेचले, वळसे व अन्य गावांच्या सार्वजनिक पाणी पुरवठा स्कीमच्या विहिरींची असल्याने त्यांचेही पाणी दुषित होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका उत्पन्न झाला आहे. या पूर्वी अनेकवेळा शेंद्रे ग्रामपंचायतीने हॉस्पिटल प्रशासनाला माहिती देऊनही त्याकडे व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्यामुळे अखेर शुक्रवारी शेंद्रे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नंदकुमार यादव,सदस्य विष्णू जाधव, संतोष पाटील, ग्रामसेवक गोविंद माने, पोलीस पाटील उमेश यादव,माजी चेअरमन विजय पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली.
यावेळी त्यांनी तेथे पंचनामही केला.दरम्यान, याबाबत ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ, गटविकास अधिकारी यांच्यासह जिल्हा आरोग्य विभागाला लेखी तक्रार केली असून शेंद्रे परिसरातील जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या अँन्को लाईफ हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाई संबंधित विभागाने करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular