Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीभाडे थकल्याने सातार्‍यात शिवसेना कार्यालयाला टाळे

भाडे थकल्याने सातार्‍यात शिवसेना कार्यालयाला टाळे

सातारा : मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले होते. त्याच सातारा जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचे भाडे थकल्याने अखेर मराठी मालकानेच टाळे ठोकून शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात खमंगपणे सुरू झाली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ बालपण सातारा शहरात गेले आहे. त्यामुळे सातारा शहराच्या इतिहासात शिवसेना या चार शब्दाने अनेकदा क्रांती करून सातारकरांना न्याय दिला आहे. स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनी सातार्‍यात अनेकदा सभा घेवून आपले हिंदुत्वादी विचार प्रकट केले आहेत. त्याचा परीणाम म्हणून विलंबाने का? होईना 1995 साली शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा नेम लागला. जावलीमध्ये सदाशिव सपकाळ व सातारचे खासदार म्हणून हिंदुराव नाईक-निंबाळकर, जावलीचे सभापती वसंतराव मानकुमरे यांनी भगवा फडकविला होता. त्यावेळच्या शिवसेनेच्या ताकतीमुळे जिल्हा परीषद, पंचायत समितीचे सदस्यांसह काही ग्रामपंचायतवर भगवा फडकला होता. निम्मा जिल्हा हा भगवामय झाला होता. पण सत्ता गेली आणि निष्ठावंत मावळे सुध्दा बाजुला पडले. सध्याची शिवसेना म्हणजे गाडी लहान पण हॉर्न मोठाफ अशी झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री विजय(बापू) शिवतारे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, हर्षद कदम, चंद्रकांत जाधव, विजय पाटील यांच्या उपस्थितीत पोवई नाक्यावर शिवसेना जिल्हा कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन झाले. जिल्ह्यातून आलेल्या शिवसैनिकांना हक्काचा निवारा मिळाला होता. मुंबईतील मातोश्रीवर जशा पध्दतीने शिवसैनिक भेट देत होते तशाच पध्दतीने सातारा जिल्हा शिवसेना कार्यालयात सुरवातील दररोज 200 ते 250 शिवसैनिक हजेरी लावत होते. जय महाराष्ट्राचा गजर घुमत होता. आता परस्थिती पूर्णपणे बदली आहे. एक वर्षापुर्वी सातारा शिवसेना शहर कार्यालय बंद करण्यात आले. त्यानंतर सातारा जिल्हा शिवसेनेच्या कार्यालयाही टाळे लागले आहेत. नोव्हेबर 2016 पासून दरमहा ठरलेले भाडे वेळेत मिळत नव्हते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेबंर 2017 पर्यंत ठरलेले भाडे मिळाले नाही. त्यामुळे मराठी माणूस असलेल्या त्या जागेच्या मालकाला अक्षरशा अर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. सध्या शिवसेनेचे कामकाज पूर्णपणे बंद झाले आहे. याठिकाणी येणार्‍या शिवसैनिकांना वस्तुस्थिती समजत असल्याने शिवसैनिक सुध्दा नाराज होत आहेत.
सुमारे दिडलाख रूपये भाडे थकले असल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या मालकिचे फर्निचर, संगणक संच, नामफलक, काही फोटो या कार्यालयात दिसत असलेतरी काचेवर लावलेल्या शिवसेना नेत्यांचे फोटो काढून टाकण्यात आले आहेत. हे कार्यालय उघडे असले की, अनेक थकबाकीदार उधारी वसुलीसाठी हेलपाटे मारतात. सफाई कामगार व देखभाल दुरूस्तीचेही पैसे मिळाले नाहीत. अशी शिवसेनेची अवस्था असताना शिवसेनेचे काही पदाधिकारी हे बडेजाव करून फिरत असतात. एका मराठी माणसाला अडचणीत आणणार्‍या या प्रकाराबद्दल आता राजकीय पक्षसुध्दा भांडवल करू लागला आहे. कारण सातार्‍यात इतर सर्व पक्षांची कार्यालये आहेत. त्याठिकाणी नियमित कामकाज चालते, मात्र शिवसेना याला अपवाद ठरल्यामुळे शिवसेनेशी निष्ठा असणार्‍या शिवसैनिकांचे अंतर्गत मन व्याकूळ होत आहे. याचातरी सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी विचार करावा अन्यथा शिवसेनेची पडझड कोणीही रोखू शकणार नाही असे भाकित वर्तविले जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular