Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीआ. पृथ्वीराज चव्हाणांकडून वांगी अपघातामधील पैलवानांच्या कुटूंबियांचे सांत्वन

आ. पृथ्वीराज चव्हाणांकडून वांगी अपघातामधील पैलवानांच्या कुटूंबियांचे सांत्वन

कराड ः वांगी (जि. सांगली) येथे शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या मालखेड येथील पैलवान सौरभ माने व काले येथील आकाश देसाई यांच्या कुटूंबियांचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भेटून सांत्वन केले. जुने मालखेड येथील सौरभच्या कुटूंबियांना ते भेटले. सांत्वनावेळी आ. चव्हाण यांनी अपघाताची माहिती जाणून घेतली. देवदास माने यांनी त्यांना माहिती दिली.
ग्रामस्थ म्हणाले, आमच्या गावात पहिलाच मल्ल तयार झाला. आणि तो काळाने आमच्यापासून ओढावून नेला. सौरभच्या घरची परिस्थिती बिकट आहे. त्यांना अवघी पंधरा गुंठे शेती आहे. त्यामध्ये भाजीपाला उत्पादीत करुन त्याची आई जवळच्या कासेगाव, बेलवडे बुद्रुक व काले येथील आठवडा बाजारात विक्रीस नेवून त्यातील उत्पन्न सौरभसाठी ठेवायची. त्या जोडीला वडील अनिल माने ऊसाच्या उत्पन्नातील कमाई सौरभसाठी खर्च करायचे. तो राष्ट्रीय खेळाडू होता. त्याच्या निधनाने कुटूंब व गावाचे नुकसान झाल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
आ. चव्हाण यांनी सौरभचे वडील अनिल माने व बहीण सौरंगिणी यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. व येथूनपुढे मी तुमच्या पाठिशी आहे, असे सांगितले. शेवटी त्यांनी सौरभने पटकावलेली पदके, गदा व प्रमाणपत्रे पाहिली. तर काले येथील आकाश देसाई यांच्या कुटूंबियांच्या भेटीप्रसंगी आ. चव्हाण यांनी आकाशचे वडील दादासो देसाई व कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुटूंबावर झालेल्या आघातामधून बाहेर येण्याबाबत त्यांनी कुटूंबियांना धीर दिला. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व क्रिडामंत्र्यांकडून आकाश देसाई व सौरभ माने यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी, अशी मागणी केली. त्यावर आ. चव्हाण यांनी याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री व क्रिडामंत्र्यांना देवून पाठपुरावा करेन, असे सांगतिले.
ग्रामस्थ म्हणाले, आकाश देसाई व सौरभ माने तसेच अपघातामधील या भागातील इतर जखमींना पैलवान नानासाहेब पाटील मित्रपरिवाराच्यावतीने अर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नास समाजातील अनेक दानशूरांनी मदतही केली आहे. यामध्ये शासनाचाही सहभाग व्हावा ही अपेक्षा आहे. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, सतीश पाटील-तांबवेकर, मालखेडचे माजी सरपंच चंद्रकांत पवार, युवराज माने, रामचंद्र होवाळ, विकास सोसायटीचे चेअरमन प्रताप माने, भिमराव होवाळ, बेलवडे बुद्रुकचे माजी सरपंच सचिन मोहिते, कालेचे माजी सरपंच संजय देसाई, माजी उपसरपंच संदिप यादव, अरुण पाटील, जयवंत नांगरे-पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular