सातारा : श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने काढण्यात आलेल्या श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे छ. शिवाजी सर्कल पोवई नाका येथे भव्य मिरवणुकीने आगमन झाल्यावर गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता पादुकांचे स्वागत माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले, विश्वास मेंहदळे यांनी केले. दरम्यान, श्री समर्थांच्या पादुका आज श्री समर्थ सदन येथे विसावणार असून शुक्रवारी या पादुकांचे प्रस्थान सज्जनगडकडे होणार आहे.
यावेळी श्री समर्थ सेवा मंडळाचे स्वागत समिती अध्यक्ष हणमंतराव किरपेकर, सचिव मनोहर कुमठेकर, सजावट प्रमुख नारायण खरे, खजिनदार मिलींद मुळे, मंडळाचे अध्यक्ष आर. बी. शिंद, कार्याध्यक्ष रविंद्र सबनीस, उपाध्यक्ष रमण वेलणकर, सचिव भास्कर मेहेंदळे, ह. भ. प. गुमनाम महाराज कोटणीस, कार्यवाह स. . मारुतीबुवा रामदासी, कार्याध्यक्ष डी. व्ही. देशपांडे, खजिनदार योगेशबुवा रामदासी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
पोवई नाका येथे भव्य रांगोळी काढली होती. श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तगण श्री राम जय राम जय जय राम तसेच जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करताना दिसत होते. सातारा शहरातील पोलीस मुख्यालय मार्गे शेटे चौक, शनिवार पेठ राजवाडा समर्थ मंदिर अशी पादुकांची मिरवणूक काढण्यात आहे. पादुकांचे शहरात ठिकठिकाणी भक्तांनी उत्स्फूर्त स्वागत केले.