पाटण:- पाटण तालुक्यातील कोयना विभागातील नाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नाव गावातीलच पोलीस पाटील व सध्या रा. पाटण (रामपूर) येथील संशयित आरोपी संतोष विचारे यास अखेर पाटण पोलिसांनी शनिवार दिनांक २९ रोजी मध्यरात्री अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम नाव गावातील अल्पवयीन मुलगी संशयित आरोपीकडे शिक्षणासाठी पाटण रामपूर या ठिकाणी राहत होती सदर मुलीवर संशयिताने अत्याचार केल्याची लेखी तक्रार मुलीच्या पालकांनी दिनांक २६ सप्टेंबर रोजी पाटण पोलीस स्टेशनला केली होती त्यानुसार पाटण पोलिसांनी संशयितांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतु संशयित आरोपीस अटक करण्यात आलेली नव्हती त्यामुळे संशयित आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी कोयनानगर विभागातील महिलांनी आवाज उठवून नाव गावातील स्थानिक व मुंबईस्थित ग्रामस्थांसह पाटण तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करून संशयित आरोपीच्या अटकेची मागणी केली. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका, दलित महिला संघटना कोयना विभाग, माहेर आधार केंद्र यासह विविध संघटनांनी पोलीस प्रशासनास निवेदन देऊन संशयित आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. तालुक्यातून विविध स्तरातून या घटनेचा निषेध केला जात होता.
शनिवारी मध्य रात्री संसयीत आरोपीला अटक केल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ नाव ग्रामस्थ व कोयना विभागातील सकल मराठा समाज बांधवांनी रविवारी पुकारलेला कोयनानगर बंद अखेर मागे घेण्यात आला.
दोषीवर कडक कारवाई करा.- सत्यजितसिंह
पाटणकर.
पाटण तालुक्यातील कोयना विभागातील दुर्गम व डोंगराळ भागातील अल्पवयीन मुलीवर केलेला अत्याचार हा सार्वत्रिक निंदनीय असून आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. पोलिसांनी याबाबत दोषींची सखोल चौकशी व तपास करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
पाटण तालुका हा सुसंस्कृत आहे अशा ठिकाणी अशी प्रकरणे खपवून घेणार नाही. अशा अपप्रवृत्तींमुळे तालुक्याची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणांनी याबाबत तात्काळ आवश्यक त्या सर्व चौकश्या व तपास करून दोषींवर लवकरात-लवकर कडक कारवाई करून कठोर शिक्षा करण्यात यावी जेणेकरून यापुढे अशा प्रकारे कृत्य करण्याचे धाडस कोणीही करणार नाही.