पाटण :- कोयना विभागातील नाव या छोट्याश्या गावातील एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी करत या घटनेचा जाहीर निषेधार्थ कोयना विभागातील हजारो महिला आणि ग्रामस्थांनी पाटण तहसीलदार कार्यालयावर गुरुवारी (आज) भव्य मोर्चा काढला. मुलीला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडु असा इशारा सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी बोलताना दिला. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांना दिले.
दरम्यान या मोर्च्यात कोयना विभागातील सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
पाटण पंचायत समितीपासून या भव्य मोर्च्याला सुरुवात झाली. झेंडा चौक, लायब्ररी चौक मार्गे हा मोर्चा पाटण तहसील कार्यालय असा काढण्यात आला. आरोपीला फाशी झालीच पाहिजे, बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे, अश्या घोषणांनी परिसर दणानुन सोडला होता.
मोर्चा तहसील कार्यालया समोर आला असता यावेळी पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटील, शिवसेना जिल्हा नेते जयवंतराव शेलार, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ, नाना गुरव, बिजेपीचे तालूका उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदर मुलीवर झालेला अत्याचार आम्ही सहन करणार नाही. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पोलिसांनी या घटनेबाबत गांभीर्याने घेऊन आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. बालिकेला न्याय मिळाला नाही तर यापुढे मोठे आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी बोलताना दिला.
शेवटी नायब तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले. या मोर्च्यात पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, हरिष भोमकर, रविंद्र पाटील, अशोकराव पाटील, विजयराव थोरवडे, बाळासाहेब कदम, डि.डि. कदम, किशोर भिंगार्डे आदीसह कोयना विभागातील महिला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.