साताराः येथील दगडी शाळा म्हणून नावाजल्या गेलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा 97 वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवारी मोठया उत्साहात सुरू झाला. आज गुरूवार दि. 27 डिसेंबर रोजी या सोहळयातील प्रमुख वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सुप्रसिध्द अभिनेत्री सातारची स्थानिक कलाकार व शाळेची माजी विद्यार्थीनी श्रृती आत्रे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
दरम्यान सालाबादप्रमाणे तीन दिवस चालणार्या या समारंभात मोठे बदल करत शाळेने 97 वर्षात प्रथमच स्नेहसंमेलन सकाळच्या सत्रात घेतले. बुधवारी संपन्न झालेल्या या सोहळयाच्या पुर्वार्धात शाळेतील इ.5 वी ते 8 वी वर्गाचे समुहनृत्य, लघुनाटिका व विविध लोकगीतांवर आधारित कलाप्रकार सादर झाले. गुलाबी थंडीत कोवळया उन्हात शाळेच्या प्रेक्षागृहापुढील मैदानावर हा सेाहळा डोळयात साठविण्यासाठी शालेय विदयार्थी विद्यार्थीनीनी हजेरी लावली होती. गणेशवंदना, देवीवंदनेनंतर आपल्या आवडीची ठेका धरायला लावणारी कोळीगीते, बालगिते तसेच हिंदी चित्रपटातील एव्हरग्रीन गाण्यांवर सादर झालेली ही नृत्ये शाळकरी मुलामुलींना उत्साहाचे आणि आनंदाचे तरंग पसरवणारी होती.
कार्यक्रमाचे सुरूवात सरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी यांनी केली. याप्रसंगी उपशालाप्रमुख डी.एस.कांबळे, संमेलनाध्यक्षा सौ. सुजाता पाटील, उपाध्यक्षा सौ.शालिनी जाधव यांच्यासह पर्यवेक्षक श्री रावडे सर, सौ. भारती पाटील, सौ.तिरमारे व विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थीनी प्रतिनिधींनी दीपप्रज्वलन केल्यावर मान्यवरांचे सत्कार झाले आणि या रंगारंग कार्यक्रमास सुरूवात झाली.
केरळ राज्यातील कथ्थककली नृत्यप्रकारातील अभिनयमुद्रा असणार्या कलाकारांनी आकर्षक कटाऊटस स्नेहसंमेलनाच्या रंगमंचावर शाळेचे कलाशिक्षक घनश्याम नवले व संदीप माळी यांनी रेखाटले होते. त्यामुळे या कार्यक्रमास आकर्षक रंगमंचाने वेगळीच झलक दिसून आली.
समुह नृत्ये सादर होवून छ. शिवरायांचा पोवाडा, देशभक्तीपर गीत व भारतमातेला वंदन करणार्या समुह नृत्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र आफळे यांनी केले. दरवर्षी साजरा होणार्या वार्षिक स्नेहभोजनाला यावर्षी खास सर्व मुलामुलींची आवडती पावभाजी व गुलाबजामचे फर्माइश शाळेने पूर्ण केल्याने प्रत्येक वर्गात सर्वानी या चविष्ट डीशवर ताव मारला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक आण्णा कंग्राळकर, सौ.शेख मॅडम, श्रीमती सुमन भिडे, सौ. इनामदार, मोहन बेदरकर आदी माजी शिक्षकांनी स्नेहभोजनास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
आज गुरूवार दि.27 रोजी सकाळी 7.30 वा. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा होणार असून याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव गोखले, शालेय समितीचे स्थानिक समिती अमित कुलकर्णी, सारंग कोल्हापूरे, आर.ए.कुलकर्णी यंाची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी शाळेतील इ.9 वी व 10 वीच्या मुलामुलींचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न होणार आहे.
(छायाः अतुल देशपांडे)
न्यु इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आज पारितोषिक वितरण सोहळा ; बहारदार कार्यक्रमानी शाळकर्यांमध्ये मोठा उत्साह
RELATED ARTICLES