Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सातार्‍यातील पाच पालिकांचा संपात सहभाग

सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सातार्‍यातील पाच पालिकांचा संपात सहभाग

सातारा : नगरपालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार, दि. 1 जानेवारी रोजी जिल्ह्यातील पालिका कर्मचार्‍यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. सातारा, कर्‍हाड, महाबळेश्वर, पाचगणी व फलटण या पालिका बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.
सातारा पालिकेतील कर्मचार्‍यांनी बंद आंदोलनात सहभागी होऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले. या आंदोलनामुळे शासकीय कामकाजासाठी आलेल्या नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. अत्यावश्यक सेवा या संपातून वगळण्यात आल्या आहेत.
कर्‍हाड पालिकेच्या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करून पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. या आंदोलनात महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. मागण्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार यावेळी कर्मचार्‍यांनी केला.
फलटण पालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कर्मचार्‍यांनी संपाला पाठिंबा दर्शविला. पाचगणी पालिकेचे कामकाज मंगळवारी सकाळपासूनच बंद होते. नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांनी पालिका प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली.
बंदमुळे सर्वच पालिकांमध्ये शुकशुकाट पसरला होता. वाई, म्हसवड व रहिमतूपर पालिका संपात सहभागी न झाल्याने येथील कामकाज मात्र नेहमीप्रमाणे सुरू होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular