कोरेगाव : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत रुजवत प्रशासनाची भूमिका रास्त बजावणार्या कोरेगांव नगरपंचायतीच्या सर्वच कर्मचार्यांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केले आहे. सातारा जिल्हा नगरपंचायत कर्मचारी संघटनेवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या बाळासाहेब सावंत व इतर तिन कर्मचार्यांचा गौरव प्रभाग 4 च्या वतीने करण्यात आला, त्यावेळी श्री. बर्गे बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी पुनम कदम-शिंदे, नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, स्वच्छता दूत राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, मिलींद बर्गे आदींची यावेळी उपस्थिती होती.
नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे पुढे म्हणाले, नगरपंचायतीच्या कामकाजात सुसूत्रता आणून कर वसूली, पाणी पुरवठा, आरोग्य, निर्मल शहर अभियान यासह स्वच्छ सर्वेक्षण अभियान असेल या सर्वच कामात कोरेगांव नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी उल्लेखनिय योगदान दिले आहे, कर्मचार्यांच्या अडीअडचणींसाठी या नगरपंचायतीला जिल्ह्याच्या संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून आम्ही सुध्दा सर्व कर्मचार्यांच्या पाठिशी उभे राहू असा विश्वासही श्री. बर्गे यांनी व्यक्त केला. यावेळी कोरेगांव नगरपंचायतीचे कार्यालय अधिक्षक बाळासाहेब सावंत यांची जिल्हाध्यक्षपदी तर जिल्हा संघटनेवर निवड झालेल्या अजित बर्गे, धनंजय पंडीत, प्रताप बुधावले, मंगल जाधव यांचा नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्या वतीने गौरवचित्र, शाल, श्रीफळ देवून विशेष गौरव करण्यात आला.
प्रारंभी प्रास्ताविक नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी करुन नगरपंचायत कर्मचारी देत असलेल्या उचीत योगदानाचा आज गौरव करताना आनंद होत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याधिकारी पुनम कदम-शिंदे यांनीही कर्मचार्यांच्या कामाचा विशेष गौरव केला. बाळासाहेब सावंत यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष नलावडे यांनी केले तर बापूसाहेब जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महिलांची उपस्थिती होती.
कोरेगांव नगरपंचायत कर्मचार्यांचे काम प्रशंसनीय : नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे ; कर्मचार्यांचा विशेष सत्कार
RELATED ARTICLES