पाटण:- पाटण सारख्या ग्रामीण भागात पाटण एज्युकेशन सोसायटी शिक्षण दानाचे पवित्र काम करत असून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून देखील समाजातील गरजूंना जीवन देण्याचे कार्य ही संस्था करत असल्याचे प्रतिपादन पाटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पाटण एज्युकेशन सोसायटी, पाटण व यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांच्या संयुक्त विध्यमाने पाटण येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, संचालक बी. एन. पाटील, दिनकरराव घाडगे,धैर्यशील पाटणकर, यशस्विनीदेवी पाटणकर, नगरसेवक दीपक शिंदे,सचिन कुंभार, नगरसेविका योगिता कुंभार, मुबारक सरकवास, विवेक चव्हाण, प्राचार्य नितेश नाडे ,विक्रम यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधीलकीचा वसा जपण्यासाठी रक्तदान हे अमूल्य दान आहे हा विचार जनमानसात रुजवण्यासाठी पाटण एज्युकेशन सोसायटीने प्रथमच हे कार्य हाती घेतले आहे. यशवंत ब्लड बँक नेहमी समाजहिताचे कार्य करण्यास तत्पर असते तालुक्यातील गरजूंना अनेक वेळा रक्ताची गरज भासते यासाठी हा उपक्रम समाजाच्या हिताचा आहे. जे रक्तदाते या शिबिरात सहभागी आहेत त्यांचे दानाचे कार्य कौतुकास्पद आहे असे ते शेवटी म्हणाले. यशवंत ब्लड बँकेचे विवेक चव्हाण म्हणाले,पाटण तालुक्यातील नागरिकानीं आजवर अनेकवेळा रक्तदानासाठी नेहमीच सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली व रक्त दात्यांची विचारपूसही केली. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध मंडळाचे, अकॅडमीचे कार्यकर्ते, नगरसेवक ,युवक, नागरीक उपस्थित होते.