Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीदिव्यांगांच्या पाठिंब्यापेक्षा आशिर्वाद लाख मोलाचाः आ. शिवेंद्रसिंहराजे

दिव्यांगांच्या पाठिंब्यापेक्षा आशिर्वाद लाख मोलाचाः आ. शिवेंद्रसिंहराजे

साताराः आज अपंग आणि दिव्यांग बंधू भगिनींच्या समोर अनेक अडचणी असतात. अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेतच पण, मी स्वत: नेहमीच वैयक्तीक स्वरुपात वाट्टेल ती मदत अपंग बंधू भगिनींसाठी देवून त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही कायम करणार आहे. आज या बांधव आणि भगिनींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यातील काही लोकांनी कायम पाठिंबा असल्याचे सांगतिले पण, मला तुमच्या पाठिंब्यापेक्षा तुमचे आशिर्वाद लाख मोलाचे आहेत, असे भावनिक उद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, बाबाराजे युवा प्रतिष्ठान करंजे आणि निशिकांत पिसाळ मित्रसमुहाच्यावतीने अपंग बंधु- भगिनींसाठी मोफत ब्लँकेटचे वाटप आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य राहूल शिंदे, नगरसेवक रवींद्र ढोणे, निशिकांत पिसाळ, अतुल चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, स्वप्नील माने, शुभम शिडतुरे, ओंकार जाधव, प्रवीण फरांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इंगवले यांनी दिव्यांग बांधवांच्या अडचणी कथन केल्या. यावेळी त्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि त्यांच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगून दिव्यांग बांधव नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील असे आश्‍वान दिले.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सौ.वेदांतिकाराजे यांनी कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी चांगले काम चालवले आहे. मोतीबिंदू तपासणी शिवाय जयपूर फूट वाटप शिबीरामुळे कर्तव्य ग्रुप दिव्यांगांसाठी चांगले काम करत असतो. या ग्रुपच्या कार्यक्रमांना मी सहसा जात नाही. याला कारण म्हणजे राजकारण पण, या ग्रुपचे काम प्रेरणदायी आहे. मी कधीही शासनाच्या योजनांवर अपंग बांधवांना अवलंबून ठेवत नाही. माझ्या परीने मी स्वत: वैयक्तीक मदत करत असतो. अनेकांना तीनचाकी सायकलही दिल्या आहेत. त्यामुळे मला राजकारणासाठी तुमचा पाठिंबा देत असाल तर त्यापेक्षाची लाखमोलाचा तुमचा आशिर्वाद आहे. तुम्हाला कोणतीही अडचण भासू द्या, मी वैयक्तीकपणे ती दूर करीन नेहमी तुमच्या सेवेसाठी कार्यरत राहीन. त्यामुळे तुमचे आशिर्वाद माझ्यावर ठेवा, असे भावनिक आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले. बाळासाहेब भुजबळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, बाबाराजे युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि निशिकांत पिसाळ मित्रसमुहाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular