कराड : कराड तालुक्यातील उंडाळेसह परिसरातील 17 गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश झाला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबचा निर्णय घेतला असून, याबाबतच शासन आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
उंडाळे विभागात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे या भागातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत उंडाळे भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी नामदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा व
स्वच्छता मंत्री लोणीकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे मुख्य सचिव शामलाल गोयल, अपर मुख्य सचिव पी. बेलारसू, मुख्य अभियंता सी. आर. गजभिये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता विजय जगतारे, सतीश सुशीर आदी मान्यवर होते.
या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पुनरुज्जिवित करावयाच्या 83 प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व्यतिरिक्त अन्य बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा नव्याने समावेश करणेबाबत चर्चा करून, यामध्ये उंडाळेसह 17 गावांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
उंडाळेसह 17 गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश
RELATED ARTICLES