Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष पी.डी.पार्टे शेठ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष पी.डी.पार्टे शेठ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

महाबळेश्वर : महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष पी. डी. पार्टेशेठ व पी. डी. पार्टे उद्योग समुहाचे शिल्पकार, संस्थापक तसेच महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका विमलताई पार्टे यांचे पती यांचे सोमवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले होते. आज पाहटे त्यांचे पार्थिव महाबळेश्वर येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी ते त्यांच्या गणेश पेठ येथील राहत्या घरी ठेवण्यात आले होते.
यावेळी महाबळेश्वर शहरासह तालुक्यातील असंख्य चाहत्यांनी त्याचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या गाडीत आदरणीय पार्टे शेठ यांचा भव्य फोटो व त्याखाली त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. संपूर्ण महाबळेश्वर नगरीतून अंत्य यात्रा काढण्यात आली. यात महाबळेश्वर शहरासह पांचगणी, वाई, केळघर -मेढा,सातारा येथील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी कार्यकर्ते, चाहते व नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
यावेळी महाबळेश्वर नागरिकांनी आप आपले सर्व व्यवहार व दुकाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवून आपल्या नेत्याला आदरांजली वाहिली.वेण्णा तलाव शेजारील पालिकेच्या वैखुंठधाम स्मशानात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. त्यात महाबळेश्वरच्या तहसीलदार मीनल कळसकर, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर देवकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक बावळेकर, शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू, मधुसागारचे चेअरमन संजूबाबा गायकवाड, बापूराव पार्टे जावली पंचायत समिती माजी सभापती, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक युसुफभाई शेख, महाबळेश्वरचे नगरसेवक व भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र कुंभारदरे, महाबळेश्वरचे विद्यमान नगरसेवक व शिक्षण समिती सभापती कुमार शिंदे, महाबळेश्वर तालुका पंचायत समिती माजी सभापती विजय भिलारे ,शिवसेना जिल्हा अध्यक्ष व महाबळेश्वर अर्बन बँकेचे चेअरमन राजेश उर्फ बंडा कुंभारदरे, पांचगणी चे जेष्ठ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते अजित कासुर्डे, चंद्रकांत जाधव, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, आदी मान्यवरांचा त्यात समावेश होता.
केळघर सारख्या खेडे गावातून उन्नतीची व विकासाची स्वप्ने बघत ती प्रत्यक्षात उतरवीत,अनेक पुरुष, महिला व युवक युवती यांना स्व:ताच्या पायावर उभे करीत सर्व जाती, धर्म पंथाच्या लोकांना बरोबर घेवून महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा विकास करून महाबळेश्वर वासीयांच्या मना मनात अधिराज्य करणारे मार्गदर्शक नेतृत्व आज आपल्यातून हरवले आहे.
महाबळेश्वरच्या जडण घडणीत पी.डी.पार्टे व त्यांच्या पार्टे परिवाराचे मोलाचे योगदान होते. हि कधीही भरून नं येणारी पोकळी असून या दुखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची ईश्वराने शक्ती ध्यावी अश्या आशयाची श्रद्धांजली सर्वांनी वाहिली. त्यानंतर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पी. डी. पार्टेशेठ यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular