पाटण :- पाटण नगरपंचायतीच्या विषय समिती व स्थायी समितीच्या सभापती निवडी जाहिर झाल्या असुन पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सभापती पदी उपनगराध्यक्ष दिपकराव शिंदे, नियोजन विकास व शिक्षण समिती सभापती पदी किरण पवार, महिला व बाल विकास समिती सभापती पदी श्रीमती सरस्वती खैरमोडे, तर बांधकाम समितीच्या सभापती पदी विजय (बापू) टोळे यांच्या निवडी झाल्या आहेत.
पाटण नगरपंचायतीच्या स्थायी समिती व विषय समिती सदस्य तसेच सभापतींच्या निवडी सोमवार दि. १४ रोजी नगरपंचायतीच्या कार्यालयात बिनविरोध पार पडल्या. यावेळी दीपक शिंदे, किरण पवार, श्रीमती सरस्वती खैरमोडे, विजय उर्फ बापू टोळे यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी यशवंत डांगे व नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाणीपुरवठा, स्वच्छता व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी दीपक शिंदे, सदस्य म्हणून सचिन कुंभार, अजय कवडे, संजय चव्हाण, नियोजन विकास व शिक्षण समिती सभापतीपदी किरण पवार, सदस्यपदी उमेश टोळे, सौ. प्राजक्ता भिसे, सौ. रश्मी राऊत महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी श्रीमती सरस्वती उत्तमराव खैरमोडे तर सदस्यपदी सौ. योगिता कुंभार, अनिता देवकांत, सौ. संगीता चव्हाण, बांधकाम समिती सभापतीपदी विजय उर्फ बापू टोळे, सदस्य म्हणून सचिन कुंभार, सचिन देसाई, संजय चव्हाण यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
नूतन पदाधिकाऱ्यांचे पीठासन अधिकारी श्रीरंग तांबे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी अभिनंदन केले. उपनगराध्यक्ष दीपक शिंदे यांनी स्वागत केले. या निवडीबद्दल माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, सभापती सौ. उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक यांनी अभिनंदन केले.