Thursday, March 28, 2024
Homeठळक घडामोडीसिध्देश्‍वर कुरोली येथे महारिंगण सोहळा उत्साहात

सिध्देश्‍वर कुरोली येथे महारिंगण सोहळा उत्साहात

वडूज : सिध्देश्‍वर कुरोली (ता. खटाव) येथील यशवंत हो जयवंत हो आश्रमाच्या मैदानावर झालेल्या महारिंगण सोहळ्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गोल रिंगण पाहण्यासाठी सुमारे 10 हजार भाविकांनी गर्दी केली होती. या निमित्ताने अश्‍व, गावोगावच्या दिंड्या, भगव्या पताकांचा डौल यामुळे कुरोली गांवाला प्रति पंढरपूरचे स्वरुप आले होते.
दुपारपासून आश्रमाकडे गावोगावच्या दिंड्या येवू लागल्या होत्या. सायंकाळी सर्व दिंड्या मंदीर परिसरात पोहोचल्यानंतर विश्‍वस्त व मान्यवरांच्या उपस्थितीत ङ्ग यशवंत हो जयवंत हो म चा गजर करत मंदीरापासून मैदानापर्यंत वाजत-गाजत पालखी आणण्यात आली. त्यानंतर मध्यभागी पालखीचे पूजन व महाआरती झाली. या ठिकाणी बाबा भक्त व गावातील युवकांनी वैरणीतील चिपाडे व इतर टाकावू वस्तूपासून भव्य विठ्ठलमुर्ती बनविण्यात आली होती. या मुर्तीच्या बाजूला भजनी मंडळ व विश्‍वस्त मंडळ होते. तर चोहो बाजूंनी रिंगण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. या गर्दीतून वाठार (ता. कोरेगांव) येथील सुरज गुजले व कुरोली येथील श्रीकांत पाटोळे यांच्या अश्‍वांनी गोल रिंगण काढले. वाद्याच्या गजरात अश्‍वांनी आठ ते दहा फेरे मारले. व्यवस्थितरित्या फेरे पुर्ण होत असताना लोकांनी टाळ्यांचा गजर केला. तत्पूर्वी संपूर्ण दिवसभर आश्रम परिसरात येणार्‍या भाविकांना देवस्थानच्या वतीने चहाप्रसाद व अन्नदानाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी यशवंतबाबांच्या राज्यभरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. दरम्यान महारिंगण सोहळ्या अगोदर आश्रमात सलग आठ दिवस भजन, किर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरु होते. यामध्ये मधुकर दिक्षीत मसूर, अभिषेक जोशी कुरोली, प्रियांका कदम विसापूर, कमलाकर भादुले, संस्थान महाराज मानेवाडी, निमसोड यांची किर्तने तर बजरंग महाराज दिवडी, हेमंत गोडसे वडूज, प. ना. लोहार, कलेढोण, हणमंत पवार विटा, यांच्या प्रवचनास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कालावधीत जनार्दन मोरे निमसोड, सुरेश मोकाशी मसूर, राऊत बंधू भिकू पाटील, द्रौपदी पवार, दिलीप इरळे, गौरव आगवेकर, डॉ. अजित देसाई, बाबुराव माने मायणी, सुभाष जाधव ना. वाडी, मुरलीधर भादुले निमसोड यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. महारिंगण सोहळ्यानंतर रात्री ह.भ.प. विजय शिंदे लोणीकर यांचे बाबांच्या जीवनचरित्रावर किर्तन व फुलांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासही भाविकांनी चांगली गर्दी केली होती.
निसर्गाची साथ
रात्री ह.भ.प. शिंदे यांच्या किर्तनाच्या अगोदर आभाळामध्ये ढग गोळा झाल्याने उपस्थित भाविक सैरभैर झाले होते. त्यावेळी शिंदे यांनी किर्तनाची सुरुवात करतानाच सांगितले की, काहीही झाले तरी भाविकांनी घाबरु नये. बाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईपर्यंत पाऊस येणार नाही. साक्षातही तसेच घडले. किर्तन होईपर्यंत पर्जन्यराजाने साथ दिली. मात्र किर्तन झाल्यानंतर सुमारे अर्धा तास चांगला पाऊस झाला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular